अलर्ट भारतीय जवानांनी पाकच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा हल्ल्याचा कट लावला उधळून
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 18:44 IST2017-09-26T18:39:52+5:302017-09-26T18:44:53+5:30
केरान सेक्टरमधील भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्याचा पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा प्रयत्न मंगळवारी भारतीय जवानांनी उधळून लावला.

अलर्ट भारतीय जवानांनी पाकच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा हल्ल्याचा कट लावला उधळून
श्रीनगर - केरान सेक्टरमधील भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्याचा पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा प्रयत्न मंगळवारी भारतीय जवानांनी उधळून लावला. पाकिस्तानच्या बॅट फोर्सचे सात ते आठ सशस्त्र सैनिक भारतीय लष्कराच्या चौकीजवळ आले होते.
त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानी सैन्याकडून कव्हर फायर देण्यात येत होती. भारतीय चौक्यांवर गोळीबार आणि मोर्टारचा मारा करण्यात येत होता. भारतीय चौकी उद्धवस्त करण्याच्या इराद्याने बॅट फोर्सचे सैनिक आले होते पण सर्तक असलेल्या भारतीय जवानांनी त्यांचा कट उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत भारताच्याबाजूला कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
मंगळवारी सकाळी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टर परिसरातही घुसखोरीचा प्रयत्न झाला होता. भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा कट उधळून लावला होता. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडत एका दहशतावाद्याला यमसदनी धाडण्यातही जवानांना यश मिळाले.
लष्कराच्या एका अधिका-यानं दिलेल्या माहितीनुसार, उरी सेक्टरच्या झोरावर क्षेत्रात दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला व एका दहशतवाद्याचा खात्मा केला. दरम्यान, चकमक घडलेल्या स्थळावरुन एक हत्यारदेखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती या अधिका-यानं दिली आहे. सध्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे.