तुफान राडा! करोडपती कुटुंबातील महिला संपत्तीसाठी एकमेकींना भिडल्या, नाल्यात पडल्या अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 13:09 IST2022-06-17T13:07:46+5:302022-06-17T13:09:00+5:30
महिलांनी एकमेकींचे केस ओढले आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या राड्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

तुफान राडा! करोडपती कुटुंबातील महिला संपत्तीसाठी एकमेकींना भिडल्या, नाल्यात पडल्या अन्...
राजस्थानमधील अजमेरमध्ये संपत्तीच्या वादातून दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. करोडपती कुटुंबातील महिला एकमेकींना भिडल्या आणि नाल्यात पडल्या. महिलांनी एकमेकींचे केस ओढले आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या राड्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या मारामारीत कुटुंबातील बाकीचे सदस्यही सहभागी झाले होते. आश्चर्याची बाब म्हणजे या दोघी महिला करोडपती कुटुंबातील असून एकमेकींच्या नातेवाईक आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटगड रोडवर असलेल्या नायरा पेट्रोल पंपावर बुधवारी सायंकाळी मालमत्तेच्या वादातून दोन्ही कुटुंब समोरासमोर आले. यावेळी दोन्ही बाजूच्या महिला एकमेकांना भिडल्या. परिस्थिती अशी झाली की एकमेकांना भिडणाऱ्या महिला पेट्रोल पंपाच्या बाहेरून जाणाऱ्या नाल्यात पडल्या आणि तिथेही एकमेकांचे केस पकडून भांडत राहिल्या. याचदरम्यान एका कुटुंबातील तरुणानेही नाल्यात उडी घेऊन महिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तर दुसरा एक तरुण देखील यामध्ये सहभागी झाला.
रस्त्यावरील लोकांनी हस्तक्षेप करून नाल्यात पडलेल्या महिलांना बाहेर काढले. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही बाजूच्या लोकांना पोलीस ठाण्यात नेले. याठिकाणी दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारींबाबत पोलीस तपास करत आहेत. शहर पोलीस अधिकारी सुरेंद्र सिंह जोधा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नायरा पेट्रोल पंपाचे मालक नरेंद्र कुमार आर्य आणि त्यांच्या कुटुंबातील एक मुलगी संगीता कुमावत यांच्यात मालमत्तेवरून वाद आहे.
संपत्तीच्या वादातून दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये हाणामारी झाली, त्यात दोन्ही बाजूचे लोक जखमी झाले. दोन्ही बाजूंकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत. याआधीही एका सामाजिक कार्यक्रमात पेट्रोल पंप मालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूने झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावर घडली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.