मतदानावेळी पक्षचिन्ह वापरल्याने अजय राय अडचणीत
By Admin | Updated: May 12, 2014 12:12 IST2014-05-12T09:47:40+5:302014-05-12T12:12:47+5:30
काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांनी वाराणसीत मतदानाला जातेवेळीस कुर्त्यावर पक्षचिन्ह लावल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे

मतदानावेळी पक्षचिन्ह वापरल्याने अजय राय अडचणीत
ऑनलाइन टीम
वाराणशी, दि. १२ - काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांनी वाराणसीत मतदानावेळेस कुर्त्यावर काँग्रेस पक्षाचे चिन्ह लावल्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून भाजपाने त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहिताभंगाची तक्रार नोंदवली आहे. यापूर्वी गांधीनगर येथील मतदानादरम्यान भाजपाचे पंतप्रधानपजदाचे उमदेवार नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे चिन्ह (कमळ) दाखवत पत्रकारांशी संवाद साधल्यामुळे झालेला गदारोळ झाला होता. त्यानंतर आता अजय राय यांच्या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान अजय राय यांनी मात्र आपण नेहमीप्रमाणे काँग्रेसचे चिन्ह शर्टवर वापरल्याचे म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान सोमवारी होत असून वाराणसीत नरेंद्र मोदी , केजरीवाल व अजय राय हे तीन दिग्गज निवडणूक लढवत असल्याने सर्वांचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. आज सकाळी काँग्रेसचे उमेदवार अजय राय मतदान करण्यास मतदान केंद्रावर आले असताना त्यांनी कुर्त्यावर काँग्रेस पक्षाचे चिन्ह (हात) लावले होते. या कृतीमुळे राय यांनी नियमाचा भंग केल्याचा आरोप होत आहे असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपाने केली आहे.