जिओनंतर आता एअरटेल अन् व्होडाफोननं 827 पॉर्न वेबसाइट्स केल्या बॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 10:13 IST2018-11-01T09:22:19+5:302018-11-01T10:13:52+5:30
रिलायन्स जिओनं गेल्या आठवड्यात पॉर्न वेबसाइट ब्लॉक केल्याची माहिती दिली होती.

जिओनंतर आता एअरटेल अन् व्होडाफोननं 827 पॉर्न वेबसाइट्स केल्या बॅन
नवी दिल्ली- रिलायन्स जिओनं गेल्या आठवड्यात पॉर्न वेबसाइट ब्लॉक केल्याची माहिती दिली होती. आता त्याच पावलावर पाऊल ठेवत एअरटेल अन् व्होडाफोनसह ब्रॉडबँड सर्व्हिस देणा-या वेबसाइट्सनी पॉर्न साइट ब्लॉक केल्या आहेत. टेलिकॉम इंडस्ट्रीतल्या आघाडीच्या कंपन्या असलेल्या एअरटेल आणि व्होडाफोननं 827 पोर्नोग्राफिक्स वेबसाइट्स बॅन केल्या आहेत.
गेल्या आठवड्यात टेलिकॉम डिपार्टमेंटनं इंटरनेट सर्व्हिस पुरवणा-या कंपन्यांना पॉर्न वेबसाइट ब्लॉक करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मुकेश अंबानींच्या जिओ नेटवर्कनं जवळपास 800 पॉर्न साइट बॅन केल्या. उत्तराखंडच्या उच्च न्यायालयानं 28 सप्टेंबर रोजी टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांना पॉर्न साइट ब्लॉक करण्याची सूचना दिली होती.
जर तुम्ही पॉर्न साइट दाखवण्यावर बंदी घातली नाही, तर तुमचे परवाने रद्द करू, असा इशाराच न्यायालयानं इंटरनेट सर्व्हिस पुरवणा-या कंपन्यांना दिला होता. त्यानंतर DoTनं सर्व इंटरनेट सर्व्हिस पुरवणा-या कंपन्यांना पॉर्न साइटवर बंदी घालण्याचे आदेश दिले. जिओ वेबसाइटनं पॉर्न वेबसाइट ब्लॉक केल्यानंतर Pornhubनं स्वतःचा डोमेन बदलून डॉट नेट केला आहे. पॉर्न वेबसाइट असलेल्या 'पॉर्नहब'नंही ट्विट केलं आहे. भारतात आमच्या वेबसाइटवर बॅन लावल्यानंतर आम्ही ग्राहकांसाठी वेबसाइटच्या डोमेनमध्ये बदल केला आहे. बिझनेस इन्सायडरनुसार, जिओ नेटवर्कवर आताही काही पॉर्न साइट पाहायला मिळतायत. यूझर्स यूसी ब्राउजरच्या माध्यमातून अश्लील वेबसाइट पाहत आहेत.