विमान प्रवास २५ टक्क्यांनी स्वस्त होणार? शुल्क माफी प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात येणार
By मनोज गडनीस | Updated: April 10, 2026 13:48 IST2026-04-10T13:48:36+5:302026-04-10T13:48:52+5:30
मुंबईसह देशातील प्रमुख ३४ विमानतळांवर ही शुल्क कपात करण्यात येणार

विमान प्रवास २५ टक्क्यांनी स्वस्त होणार? शुल्क माफी प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात येणार
मनोज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: इराण-अमेरिका युद्धामुळे इंधन शुल्कात झालेल्या मोठ्या वाढीनंतर विमान प्रवास महागल्याच्या मुद्यावर विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आता देशभरातील विमानतळांवरील पार्किंग व लँडिंग शुल्कात २५ टक्क्यांनी कपात करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शुल्क माफी प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून, यामुळे देशांतर्गत विमान तिकिटे २५ टक्क्यांनी कमी होण्याचे संकेत आहेत.
मुंबईसह देशातील प्रमुख ३४ विमानतळांवर ही शुल्क कपात करण्यात येणार असून, आगामी तीन महिन्यांकरिता ती कायम राहणार आहे. केंद्र सरकारने याची अंमलबजावणी करण्याचे आदेश एअरपोर्टस् इकोनॉमिक रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाला दिले आहेत. हेच आदेश भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या विमानतळांनाही लागू राहणार आहेत.
विमान इंधनाच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर तसेच पश्चिम आशियातील विमान सेवा विस्कळीत झाल्यामुळे विमान कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत आहे. याचा फटका केवळ आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमान प्रवास महाग झाल्याचा मुद्दा नसून देशांतर्गत मार्गांवरील किमतीही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.
...कशी होते दर आकारणी?
विमानाचे वजन आणि आकारमान यानुसार लँडिगचे शुल्क आकारले जाते. सरासरी विचार करता किमान देशांतर्गत मार्गावर ५,२५० रुपये ते ८ हजार रुपयांपर्यंत ही शुल्क आकारणी होते. तर, आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी किमान २० हजार रुपयांची शुल्क आकारणी होते.
विमानाच्या वजनानुसार आणि वेळेनुसार प्रति तासाप्रमाणे पार्किंग शुल्क आकारले जाते.
२५% विमानतळावरील पार्किंग व लँडिंग शुल्कात झालेली घट
आगामी काळात उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सरकारने कमी केलेल्या पार्किंग व लँडिंग शुल्काचा फायदा ग्राहकांना देण्यात येणार आहे, असे संकेत विमान कंपन्यांतील सुत्रांनी दिले. दरम्यान, पार्किंग व लँडिंग शुल्कात २५ टक्क्यांची कपात केल्यानंतर या प्रमुख विमानतळांवरून ४०० कोटी रुपयांची महसूल तूट होणार आहे.