युद्धात हवाई सुरक्षा महत्त्वाची - लष्करप्रमुख मनोज नरवणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 03:25 IST2020-01-12T03:25:04+5:302020-01-12T03:25:19+5:30

एअर डिफेन्स कमांडची लवकरच स्थापना!

Air Security Important in War - Army Chief Manoj Narvano | युद्धात हवाई सुरक्षा महत्त्वाची - लष्करप्रमुख मनोज नरवणे

युद्धात हवाई सुरक्षा महत्त्वाची - लष्करप्रमुख मनोज नरवणे

भावेश ब्राह्मणकर 

नवी दिल्ली : बालाकोट हल्ल्यात आपले हेलिकॉप्टर आपल्याच हद्दीत कोसळणे ही तांत्रिक चूक होती; पण आता अशा चुका होणार नाहीत. युद्धात हवाई सुरक्षा सर्वात महत्त्वाची ठरते. त्यामुळे लवकरच ‘एअर डिफेन्स कमांड’ स्थापण्यात येईल, अशी माहिती नवनियुक्त लष्करप्रमुख मनोज नरवणे ‘लोकमत’ला विशेष मुलाखतीद्वारे दिली. सीमा सुरक्षा, पर्यावरण रक्षण, आधुनिकीकरण, नवतंत्रज्ञान या विषयावरही लष्करप्रमुख विस्तृतपणे बोलले

संरक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधांबाबत काय सांगाल?
संरक्षण मंत्रालयाने निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती. सशस्त्र दलांच्या लढाऊ क्षमतेत वाढ करणे हा त्याचा उद्देश होता. या समितीच्या शिफारशींनुसार अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. सीमेवर योग्य ती रसद पुरवण्यासाठी उपाययोजना करण्याचीही शिफारस आहे. त्यानुसार सीमेवर रस्त्यांचे जाळे विकसित केले जात आहे. काही ठिकाणी वाहनांचे डेपोही उभारत आहोत.

लष्करी प्रशिक्षणातील आव्हाने कोणती?
आधुनिक काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षणावर विशेष भर देत आहोत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शस्त्रास्त्र आणि बहुविध संकल्पनांचा केवळ अवलंब करून उपयोग नाही. त्यामुळे जवानांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच त्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. हे काम प्राईस वॉटर हाऊस कंपनीला काम देण्यात आले आहे. हा पायलट प्रोजेक्ट आहे. तो यशस्वी झाला, तर त्याची व्यापक अंमलबजावणी केली जाईल.

संरक्षण क्षेत्राला ‘मेक इन इंडिया’चा फायदा झाला?
‘मेक इन इंडिया’चा मोठा फायदा होत आहे. लष्कराने एका अधिकाºयाला विशेष जबाबदारी दिली आहे. त्याद्वारे खासगी भारतीय थेट किंवा परदेशी कंपन्यांसमवेत संयुक्त प्रस्ताव देतात. त्यावर विचार होतो. आवश्यक त्याबाबी आम्ही त्यांना सांगतो. आतापर्यंत सुमारे नऊ प्रस्तावांना मान्यता दिली असून, काही विचाराधीन आहेत. यापुढेही हे सुरूच राहील.

आपण नुकताच सियाचीन दौरा केलात. त्याविषयी..?
सियाचीनची पोस्ट भारतासाठी अतिशय महत्त्वाची आहे. मी तिथे जाऊन आलो. पाकिस्तान व चीन या शेजाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ही पोस्ट महत्त्वाची आहे. नैसर्गिक आव्हाने असूनही तिथे आपले जवान सज्ज आहेत.

पर्यावरण सुरक्षाही महत्त्वाची आहे
अर्थातच. पर्यावरण सुरक्षित राहिले पाहिजे, असे लष्करालाही वाटते. त्यामुळे कॅन्टॉन्मेंट बोर्ड असो की, लष्कराच्या अखत्यारीत येणारी ठिकाणे, आमचा परिसर हिरवा राहील, याची आम्ही काळजी घेतो. जवळपास सर्व ठिकाणी सौर ऊर्जा व एलईडी दिव्यांचा वापर केला जातो. वरिष्ठ अधिकारी ई-कारचा वापर करतात. हा वापर वाढवायचा आहे. त्यामुळे पर्यावरणास हातभार लागेल. पर्यावरणस्नेही योजना आम्ही जाणीवपूर्वक राबवतो.

लष्कराचे वैशिष्ट्य काय?
आपले लष्कर अतिशय प्रतिष्ठित व व्यावसायिक पद्धतीने काम करते. शिस्त ही लष्कराची ओळख आहे. भारतीय राज्यघटना ही सर्वोच्च असून, तीच लष्कराचा मार्गदर्शन करीत आहे.

आगामी वाटचाल कशी असेल?
गुणवत्ता, प्रशिक्षण, विश्वास, मान्यता यांना आम्ही महत्त्व देतो. कुठलेही आव्हान परतवून लावण्याची ताकद लष्करात आहे. प्रतिकूल परिस्थितीलाही आपले जवान धैर्याने समर्थपणे तोंड देत आहेत. विजयश्री मिळवत आहेत. आजवरच्या युद्धांनी ते सिद्ध केले आहे.
 

Web Title: Air Security Important in War - Army Chief Manoj Narvano

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.