Air India Plane Crash Latest news: एअर इंडियाचे एआय१७१ हे विमान १२ जून रोजी दुपारी पडले. प्रचंड मोठा स्फोट झाला. ज्या ठिकाणी हे विमान पडले, ते विद्यार्थ्यांचे वसतिगृह होते. त्यावेळी विद्यार्थी मेसमध्ये जेवण करत होते. काही जणांचा जेवणाच्या ताटावरच मृत्यू झाला. याच ठिकाणी मित्रांसोबत जेवत असलेल्या केशवने मृत्यूला हुलकावणी दिली. विमान पडण्यापूर्वी आणि पडल्यानंतर मेसमध्ये काय घडले, याबद्दलचा अनुभव त्याने सांगितला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केशव भडाना अहमदाबादमधील बीजे वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या केशवने एनडीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, 'ज्यावेळी हे विमान पडले, त्यावेळी आम्हाला असं वाटले की पाकिस्तानने मिसाईलची डागली आहे.'
जेवण करत असतानाच कोसळली भिंत
केशव म्हणाला, "१ ते २ वाजेच्या दरम्यान आमची जेवणाची वेळ असते. अंदाजे दीड वाजता आम्ही मेसमध्ये जेवण करत होतो. अचानक भिंत आणि छत कोसळायला लागले. आधी धूळीच्या वादळासारखे दृश्य होते. नंतर वाटलं की भूकंप आलाय. नंतर आम्हाला वाटलं की पाकिस्तानने मिसाईल हल्ला केला आहे. मी घाबरलो. मी डोळे झाकले. काही क्षणाने डोळे उघडले तेव्हा वरून सुटकेस कोसळू लागल्या. तेव्हा मला वाटलं की विमान पडलं असावं."
वाचा >>अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
आम्ही सहा जण जेवत होतो, चौघांचा मृत्यू झाला
केशव भडाना म्हणाला, "माझ्या अंगावर भिंत कोसळताना दिसली. मी पाठीमागच्या दिशेने पडलो. त्यामुळे माझ्या हात, पाय आणि डोक्याला मार लागला. माझे पाय त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले होते. ज्यावेळी विमान पडले, तेव्हा मेसमध्ये ५० जण जेवण करत होते. माझ्या टेबलवर आम्ही सहा मित्र जेवण करत होतो. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. त्यात माझा एक खूप जवळचा मित्र होता. मला त्याची खूप आठवण येतेय", असे सांगताना केशव भावूक झाला.
विमान कोसळल्यानंतर सिलेंडरचे स्फोट
"आम्ही मेसच्या पहिल्या मजल्यावरच होतो आणि त्याच मजल्यावर जास्त नुकसान झाले आहे. विमान कोसळल्यानंतर छत आणि भिंत कोसळली. त्यामुळे आरडाओरड सुरू झाली. त्यानंतर काळा धूर झाला, त्यामुळे काही दिसत नव्हतं. त्याचवेळी मेसमध्ये असलेले सिलेंडर फुटायला लागले. अनेकांना हालचालही करता येत नव्हती. कदाचित ते मेले होते. आम्ही कसेतरी पहिल्या मजल्यावरून खाली आलो. खाल्यावर बघितले तेव्हा खूप लोक मदतीसाठी ओरडत होते", असे केशव म्हणाला.