अहमदाबाद - गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेले विमान टेकऑफनंतर काही मिनिटांतच कोसळले. या भीषण अपघातात २६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. हा विमान अपघात घडला तेव्हा एका युवकाने हे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले होते. त्यामुळे विमान उड्डाणापासून खाली कोसळण्यापर्यंत हा व्हिडिओ कसा काय रेकॉर्ड केला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. लोकांच्या मनात पडलेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यन नावाच्या युवकाने स्वत: दिली आहेत.
अहमदाबाद प्लेन क्रॅशचा व्हिडिओ बनवणारा आर्यन सध्या घाबरलेल्या स्थितीत आहे. गुरुवारी आर्यन त्याच्या गावावरून अहमदाबादला आला होता. इथं पोहचताच त्याच्या घराच्या परिसरात एअरपोर्ट असल्याचे कळले. या एअरपोर्टवरून सातत्याने विमान उड्डाण आणि लँडिंग होत होती. हे दृश्य आर्यनला उत्साहित करणारी होती. त्यामुळे यातील विमानाचे उड्डाण त्याने मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्याचं ठरवले. हा व्हिडिओ बनवून गावी गेल्यावर मित्रांना दाखवायचा होता. योगायोगाने एअर इंडियाचे बोइंग 787 विमानाने विमानतळावरून उड्डाण घेतले. हे विमान जेव्हा टेकऑफ झाले तेव्हा आर्यनने हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली.
आर्यन मोबाईलच्या कॅमेऱ्यातून या विमानाचे चित्रिकरण करत होता. तितक्यात विमान खाली येताना दिसले आणि एका इमारतीवर कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की संपूर्ण परिसरात आगीमुळे धुराचे लोट पसरले. जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो तेव्हा या विमानाचा अपघात होईल याची कल्पनाही आर्यनला नव्हती. मित्रांना दाखवण्यासाठी तो त्याच्या मोबाईलमध्ये हे रेकॉर्ड करत होता. या विमानाच्या आधी जे विमान उडाले ते उंचीवर होते परंतु हे विमान खालून जात होते असंही आर्यनने म्हटलं.
"अम्मी, मैं लंडन जा रहा हूं, खयाल रखना"
दरम्यान, ‘‘अम्मी, मैं लंडन जा रहा हूं, अपना खयाल रखना..!’’ असे फोनवर सांगत तो विमानात बसला आणि काही वेळातच त्याचे विमान कोसळले. पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकारामनगर येथील इरफान समीर शेखची ही दर्दभरी दास्तान. एअर इंडियात क्रू मेंबर असलेल्या इरफानचा अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. इरफानने अम्मी-अब्बू-भय्यासोबत आठवडाभरापूर्वी साजरी केलेली बकरी ईद शेवटचीच ठरली. इरफान शेख एअर इंडिया कंपनीत कॅबिन क्रू म्हणून दोन वर्षांपासून कार्यरत होता.