"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 20:09 IST2025-06-27T20:02:16+5:302025-06-27T20:09:27+5:30
रेनेने वेगवेगळ्या ई-मेल आयडीवरून दिल्ली, पंजाब, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगाणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये बॉम्बच्या खोट्या धमक्या देणारे इ-मेल पाठवले होते.

"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
प्रेमात नकार मिळालेल्या एक तरुणीने बदला घेण्यासाठी असे काही कृत्य केले की, दिल्ली सह 12 राज्यांचे पोलीस, गुप्तचर संस्था आणि शेकडो सुरक्षा कर्मचारी कामाला लागले.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमसह १२ राज्यांमध्ये २१ हून अधिक वेळा, बॉम्बच्या खोट्या धमक्या दिल्याबद्दल पोलिसांनी चेन्नईतील रेने जोशिल्दा या तरुणीला अटक केली आहे. ही तरुणी रोबोटिक्समध्ये प्रशिक्षित अभियंता आहे आणि चेन्नईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर काम करते. नुकतेच, एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर, तिने तिच्या 'प्रियकर'ला अडकवण्यासाठी, त्याच्या नावाने, एक ईमेल करून, आपणच हे विमान पाडले, असे म्हटले होते.
नेमकं प्रकरण काय? -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेने तिचा सहकारी असलेल्या दिविज प्रभाकरच्या एकतर्फी प्रेमात पडली, मात्र फेब्रुवारी महिन्यात प्रभाकरने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. यामुळे रेने सूडबुद्धीने पेटली होती. तिने प्रभाकरच्या नावाने अनेक ईमेल आयडी तयार केले आणि बॉम्बसंदर्भात खोटी माहिती असलेले ईमेल पाठवण्यास सुरुवात केली. तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कुशल असल्याने, तिने पोलिसांपासून वाचण्यासाठी डार्क वेब आणि व्हर्च्युअल आयडीचा कौशल्यपूर्वक वापर केला. मात्र, अखेर पोलिसांनी तिला शोधलेच.
एअर इंडियाचे विमान क्रॅश झाल्यानंतर म्हणाली, ताकत समजली? -
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद विमान अपघातानंतर, रेनेने बी. जे. मेडिकल कॉलेजला ई-मेल पाठवून, आता तुम्हाला ताकद समजली असेलच. जसे की, काल ई-मेल केला होता. आज एअर इंडियाचे विमान क्रॅश करवण्यात आले. आपल्याला माहीत आहे की, पोलिसांनी बनावट धमकी समजून याकडे दुर्लक्ष केले असेल. शाब्बास पायलट. आता आपल्याला समजले असेल, आम्ही खेळत नव्हतो.
मे ते जून दरम्यान पाठवले होते धमक्यांचे मेल -
रेनेने वेगवेगळ्या ई-मेल आयडीवरून दिल्ली, पंजाब, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगाणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये बॉम्बच्या खोट्या धमक्या देणारे इ-मेल पाठवले होते. हे सर्व ई-मेल जून 2025 पर्यंत पाठवण्यात आले होते.