अहमदाबाद - गुजरातच्या अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये अनेक कुटुंबाला आयुष्यात कधीही न भरून येणारी जखम दिली आहे. ज्याची भरपाई कुणीच करू शकत नाही. अहमदाबादमध्ये राहणारे सौरिन पालखीवाला यांच्या कुटुंबाला एअर इंडिया विमान दुर्घटनेनंतर सर्वात कटू आठवण पुन्हा समोर आली. अहमदाबादमध्ये १९८८ मध्ये झालेल्या विमान अपघातात त्यांनी बहिणीच्या होणाऱ्या सासऱ्यांना गमावले होते तर १२ जूनला झालेल्या अपघातात त्यांची २६ वर्षीय मुलगी संजना हीदेखील दुर्घटनेत बळी पडली. विमान दुर्घटनेत संजनाचा मृत्यू झाला आहे.
सौरिन पालखीवाला म्हणाले की, जेव्हा मला एअर इंडिया प्लेन क्रॅशची माहिती मिळाली, तेव्हा मला संजनाची चिंता सतावू लागली. ती सुखरुप असावी अशी प्रार्थना करत होतो. मी ऑफिसमधून तात्काळ घरी गेलो, पत्नी सोनालीला उठवले आणि तातडीने हॉस्पिटलच्या दिशेने गेलो. मी खूप घाबरलो होतो, याआधीही मी दुर्घटनास्थळ पाहिले आहे. १९८८ साली मी माझ्या डोळ्यादेखत प्लेन क्रॅश होताना पाहिलंय. त्या अपघातात माझ्या बहिणीचे सासरे प्रदीप दलाल यांचा मृत्यू झाला होता. संजना तिच्या कॉलेजमधील मित्रांना भेटण्यासाठी यूकेला चालली होती. देवाने इतक्या वर्षांनी आम्हाला एक मुलगी दिली तीदेखील लवकर हिरावली असं सांगत त्यांचे डोळे पाणावले.
१४ वर्षांनी झाली होती मुलगी
संजनाचा जन्म आमच्या लग्नानंतर १४ वर्षांनी झाला होता. माझी पत्नी देवी गायत्रीची खूप मोठी भक्त होती. जेव्हा संजनाचा जन्म झाला तेव्हा आम्ही देवाचे आभार मानले. ती खूप प्रेमळ होती, आज घरात तिच्या बऱ्याच आठवणी आहेत. पेटिंग्स आहेत. संजनाने पुण्यातून बीबीए पूर्ण करून न्यूयॉर्क विद्यापीठात पुढचे शिक्षण घेतले होते. संजनाने तिच्या फोटोंनी घर सजवले होते. या विमान दुर्घटनेत आमची एकलुती एक मुलगी गेली असं त्यांनी सांगितले. संजनाच्या मृत्यूने पालखीवाला कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. जर नशिबाने हेच करायचे होते तर १४ वर्षांनी देवाने मुलगी जन्मल्याचे सुख का दिले असा सवाल त्यांनी देवाला विचारला आहे. मुलीचं लग्न ठरवायच्या वयात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली असं सांगत तिची आई धाय मोकलून रडली.
कशी होती संजना?
संजनासोबत माझे खूप चांगले संबंध होते. आम्ही दोघी जुळ्या बहिणीसारख्या होत्या. तिने अलीकडेच टेनिस खेळायला सुरुवात केली होती. क्रिकेटही खेळायची. ती खूप मजेशीर आयुष्य जगत होती. ज्यात तिला डान्स करणे, शिक्षण घेणे, पेटिंग करणे आणि प्रवास करणे खूप आवडत होते असं तिची बहीण सलोना पालखीवाला हिने सांगितले.