Air India: बंगळुरुहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात एका प्रवाशाने अचानक कॉकपिटचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे विमानात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे त्या प्रवाशाने योग्य पासकोडही टाकला होता, पण हायजॅक होण्याच्या भीतीने कॅप्टनने दार उघडले नाही. हा प्रवासी आपल्या आठ सहकाऱ्यांसोबत प्रवास करत होता. या घटनेनंतर सर्व 9 जणांना सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले.
एअर इंडियाचे स्पष्टीकरण
एअर इंडियाने या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "संबधित प्रवासी टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने कॉकपिटजवळ गेला आणि दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. आम्ही सर्वांना खात्री देऊ इच्छितो की, विमानात कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. लँडिंगनंतर तात्काळ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली असून, सध्या चौकशी सुरू आहे."
पायलटची सतर्कता
मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर थोड्याच वेळात प्रवाशाने टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने कॉकपिटचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. पासकोड टाकल्यावर पायलटला समजले, मात्र हायजॅक होण्याच्या शंकेने पायलटने दार उघडले नाही. या घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे की, त्या प्रवाशाला कॉकपिटचा पासकोड कसा माहित होता? सध्या या घटनेची चौकशी सुरू आहे.