Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 06:17 IST2025-06-15T06:14:32+5:302025-06-15T06:17:28+5:30

Ahmedabad Plane Crash Updates: मलबा हटवताना आणखी एक मृतदेह शनिवारी सापडल्याने एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा २७०वर पोहोचला.

Air India Ahmedabad plane crash: Death toll hits 270 | Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०

Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०

अहमदाबाद : मलबा हटवताना आणखी एक मृतदेह शनिवारी सापडल्याने एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा २७०वर पोहोचला. सर्व मृतदेह अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. या भीषण विमान अपघातामागची कारणे शोधण्यासाठी व भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती केंद्र सरकारने स्थापन केली आहे. 

अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे डेप्युटी सिव्हील सुपरिंटेंडंट रजनीश पटेल यांनी सांगितले की, आतापर्यंत २४८ मृतदेहांचे डीएनए नमुने तपासलेले आहेत, त्यापैकी ११ मृतदेहांचे डीएनए जुळले आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, केंद्रीय गृहसचिवांची चौकशी समिती ३ महिन्यांत अहवाल सादर करेल. बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेलमधून मलबा काढताना, विमानाच्या शेपटीत (मागील भागात) एक मृतदेह अडकलेला दिसला. त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. हा मृतदेह एअर होस्टेसचा असू शकतो.

चौकशीत अनेक  यंत्रणा सहभागी
बोईंग ७८७ ड्रीमलाइनरच्या चौकशीत विमान अपघात तपास संस्था (एएआयबी), नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए), अहमदाबाद पोलिस या यंत्रणा अपघाताच्या चौकशीत सहभागी झाल्या आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. 

अपघाताचा व्हिडीओ बनवणाऱ्या मुलाचा पोलिसांसमोर जबाब
विमान अपघाताचा मोबाईल फोनवरून व्हिडीओ बनवणाऱ्या १७ वर्षीय मुलाचा जबाब अहमदाबाद पोलिसांनी नोंदविला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पत्रकारांशी बोलताना व्हिडीओ बनविणारा मुलगा आर्यन म्हणाला की, रेकॉर्डिंग सुरू केल्यानंतर २४ सेकंदात हा अपघात झाला. आर्यन हा नियमितपणे विमानांच्या उड्डाणाचे व्हिडीओ बनवितो. त्या दिवशी या व्हिडीओमध्ये या विमान अपघाताचे शूटिंग झाले. पोलिसांनी सांगितले की,  व्हिडीओ बनवल्याबद्दल कोणालाही अटक करण्यात आलेले नाही. व्हिडीओ बनवणाऱ्या अल्पवयीन मुलाने व्हिडीओची माहिती पोलिसांना दिली आहे. तो त्याच्या वडिलांसोबत साक्षीदार म्हणून त्याचे म्हणणे नोंदवण्यासाठी आला होता. त्यानंतर मुलाला त्याच्या वडिलांसोबत पाठवण्यात आले. आर्यन म्हणाला, मी जे पाहिले ते पाहून मी खूप घाबरलो. माझ्या बहिणीने माझा व्हिडीओ सर्वात आधी पाहिला व वडिलांना कळविले. 

Web Title: Air India Ahmedabad plane crash: Death toll hits 270

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.