देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात एअर ॲम्बुलन्स; एक अब्ज डॉलरचा करार केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 07:21 IST2025-02-19T07:13:14+5:302025-02-19T07:21:16+5:30
या एअर ॲम्बुलन्स देशातील प्रत्येक जिल्ह्यात तैनात केल्या जाणार आहेत.

देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात एअर ॲम्बुलन्स; एक अब्ज डॉलरचा करार केला
नवी दिल्ली : भारतात लवकरच इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी आयआयटी मद्रासच्या इलेक्ट्रिक एअरक्राफ्ट स्टार्टअप ईप्लेन कंपनीने एक अब्ज डॉलरचा (जवळपास ८६ अब्ज रुपये) करार केला आहे. त्याअंतर्गत भारतातील आघाडीची हवाई रुग्णवाहिका कंपनी ‘आयसीएटीटी’ला ७८८ एअर ॲम्ब्युलन्स देण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मदत होणार आहे.
या एअर ॲम्बुलन्स देशातील प्रत्येक जिल्ह्यात तैनात केल्या जाणार आहेत. ईव्हीटीओएल या तंत्रज्ञानामुळे एअर ॲम्बुलन्स थेट जमिनीवरून उड्डाण करू शकते. शिवाय जमिनीवर उतरण्यासाठी या ॲम्बुलन्सला धावपट्टीची गरज लागणार नाही. हेलिकॉप्टरप्रमाणे सुविधा देणारी ही एअर ॲम्ब्युलन्स पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे.
...या कंपन्या एअर ॲम्बुलन्स क्षेत्रात उतरणार
भारतात ईव्हीटीओएल निर्माण करण्याच्या क्षेत्रात ईप्लेन कंपनीसोबतच आर्चर एव्हिएशन, सरल एव्हिएशन यांचा समावेश आहे. उबरसारख्या ॲपवर आधारित टॅक्सी सेवा कंपन्यादेखील हवाई टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी प्रोटोटाइपचा विकास व चाचणी करत आहेत.
भविष्यातील योजना
२०२६ शेवटच्या तिमाहीत एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचे लक्ष्य.
प्रत्येक वर्षी किमान १०० एअर ॲम्बुलन्सची निर्मिती
स्टार्टअपसाठी जवळपास ८६० अब्ज रुपयांचा अतिरिक्त निधी जमा करण्यासाठी प्रयत्न आहे.
...अशी आहे एअर ॲम्बुलन्स
एअर ॲम्ब्युलन्सचा विंगस्पॅन अर्थात पंखांचा विस्तार ८ मीटर आहे. त्यामुळे ही ॲम्ब्युलन्स घराच्या छतावर किंवा रस्त्यालगतच्या कमी जागेवरही लँड केली जाऊ शकते.
रस्त्यावरून धावणाऱ्या रुग्णवाहिकेपेक्षा या ॲम्बुलन्सचा वेग सात पट अधिक आहे.