मी प्रभू श्रीरामाचा आदर करतो पण नथूराम गोडसेचा तिरस्कार करतो - असदुद्दीन ओवेसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 15:27 IST2024-02-10T15:24:50+5:302024-02-10T15:27:14+5:30
असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

मी प्रभू श्रीरामाचा आदर करतो पण नथूराम गोडसेचा तिरस्कार करतो - असदुद्दीन ओवेसी
लोकसभेत बोलताना खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी सांगितले की, राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात काय सुरू आहे? बाबरी मशीद जिंदाबाद होती, आहे आणि राहील. मोदी सरकार हे केवळ एका धर्माचे सरकार आहे का? की सगळ्या धर्मांना मानणारे सरकार आहे? २२ जानेवारीचा आनंद साजरा करून तुम्ही कोट्यवधी मुसलमानांना काय संदेश देत आहात? एका धर्माने दुसऱ्या धर्मावर विजय मिळवला, असे सरकारला सांगायचे आहे का? देशातील १७ कोटी मुस्लिमांना तुम्ही काय संदेश देत आहात? १९९२, २०१९, २०२२ मध्ये मुस्लिमांचा विश्वासघात केला, मी बाबर, औरंगजेब, जिना यांचा प्रवक्ता नाही.
लोकसभेत राम मंदिराची उभारणी आणि अभिषेक सोहळा या विषयावरील चर्चेदरम्यान एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, मला विचारायचे आहे की, मोदी सरकार हे एका विशिष्ट समुदायाचे, धर्माचे सरकार आहे की संपूर्ण देशाचे सरकार आहे? भारत सरकार हा माझा धर्म आहे का? मला वाटते की या देशाचा कोणताही धर्म नाही. मी प्रभू श्रीरामाचा आदर करतो, पण मी नथुराम गोडसेचा तिरस्कार करतो कारण त्याने अशा व्यक्तीला मारले ज्याचे शेवटचे शब्द 'हे राम' असे होते.
मी श्रीरामाचा आदर करतो पण...
"६ डिसेंबर १९९२ नंतर देशात दंगली उसळल्या होत्या. अनेक तरुणांना तुरुंगात टाकले आणि ते वृद्ध म्हणूनच बाहेर आले. मी प्रभू श्रीरामाचा आदर करतो. पण मी नथुरामचा तिरस्कार करतो कारण त्याचे शेवटचे शब्द 'हे राम' होते अशा व्यक्तीला त्याने मारले. बाबरबद्दल ओवेसीला का विचारता? बोस, नेहरू आणि आपल्या देशाबद्दल विचारायचे", असेही त्यांनी नमूद केले.
तसेच अलीकडेच एका खासदाराने सांगितले की, ६ डिसेंबरला जेव्हा बाबरी मशीद पाडली जात होती, तेव्हा नरसिंह राव पूजा करत होते. रथयात्रा काढणाऱ्या व्यक्तीला देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे. यावरून सरकारची भूमिका कशी आहे हे दिसून येते. न्याय जिवंत आहे की अत्याचार कायम आहे?, अशा शब्दांत ओवेसींनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न दिल्यामुळे सरकारवर टीकास्त्र सोडले.