Operation Sindoor: पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केवळ भारताच्या पंतप्रधानांना नाही तर येथील सर्व लोकांना आव्हान दिले होते. आता पाकिस्तानने मसूद अझहरच्या नातेवाईकांचा धर्म विचारला पाहिजे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून लोकांना मारले. कारण भारतात हिंदू-मुस्लिम द्वेष निर्माण करण्याचा त्यांचा कट होता. त्यानंतर भारताने जी कारवाई केली, ती इतिहासात नोंदवली जाईल. पाकिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून असलेले दहशतवादी ठिकाणे नष्ट करणे आवश्यक होते. हा एक मैलाचा दगड ठरला आहे, असे कौतुकोद्गार एमआयएम नेते शोएब जमई यांनी काढले आहेत.
भारताने नऊ शहरांमध्ये हल्ले केल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजता जम्मू शहर व अन्य ठिकाणी हल्ले करण्याचा पाकिस्तानचा डाव भारताने उधळून लावला. पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रे व सुमारे ५० ड्रोन भारताने पाडले. त्यानंतर भारताने मध्यरात्री पाकच्या अनेक शहरांवर हल्ला केल्याचे वृत्त होते. भारताने चहुबाजूंनी पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जमई आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
१५ मिनिटे सत्ता द्या, पाकिस्तानला कसे नेस्तनाबूत करायचे ते दाखवून देऊ
या मुलाखतीत संताप व्यक्त करत जमई म्हणाले की, भारतातील मुस्लिमांना फक्त १५ मिनिटांसाठी सत्ता हाती द्यावी. पाकिस्तानला कसे नेस्तनाबूत करायचे हे आम्ही दाखवून देऊ. भारतातील मुस्लिमांनी द्विराष्ट्र सिद्धांत नाकारला आहे. देशाच्या उभारणीत, जडणघडणीत आणि प्रगतीत आम्ही महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे जमई यांनी सांगितले. तसेच भारतीय सीमांवर कोणी वाकड्या नजरने किंवा कोणतीही हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, त्यांचा नाश करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. कर्नल सोफिया कुरेशी यांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, जेव्हा भारताच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो, तेव्हा भारतातील मुस्लिम सर्वोच्च त्याग करून सीमांचे रक्षण करण्यास तयार असतात.
दरम्यान, एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ऑपरेशन सिंदूर कारवाईचे कौतूक केले. एका सभेत ओवेसी यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आणि ‘हिंदुस्तान जिंदाबाद’ या घोषणा दिल्या. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून सातत्याने करण्यात येत होती. देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करु नये. तसेच या प्रसंगी आपण सर्व एक आहोत, हे दाखवून देऊ. ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानसाठी एक संदेश आहे, असे ओवेसी यांनी म्हटले होते.