सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 21:45 IST2025-12-10T21:44:35+5:302025-12-10T21:45:19+5:30
महत्वाचे म्हणजे, पॉझिटिव्ह रुग्णांनी निगेटिव्ह व्यक्तींशी विवाह करू नये, असेही डॉ. अख्तर यांनी म्हटले आहे.

सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
बिहारमधील सीतामढी जिल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, येथे एचआईव्ही पॉझिटिव्ह रुग्णांचा जो आकडा समोर आला आहे. तो धक्कादायक आहे. जिल्यात एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल 7,400 पर्यंत पोहोचल्याचे बोलले जात आहे. दरमहिन्याला 40 ते 60 नवे रुग्ण आढळत असल्याने आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, असे असले तरी, एड्सग्रस्त रुग्णांच्या एकूण संख्येसंदर्भात अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, या रुग्णांमध्ये 400 हून अधिक अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सीतामढीमध्ये अशी गंभीर स्थिती का निर्माण झाली? यासंदर्भात एका माध्यमाशी बोलताना सदर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. हसीन अख्तर म्हणाले, जिल्ह्यात परराज्यात काम करणाऱ्या स्थलांतरितांची संख्या मोठी असल्याने संक्रमणाचे प्रमाण वाढले आहे. दिल्ली, मुंबईसह विविध शहरांतून परतणारे अनेक जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळत आहेत.
"पॉझिटिव्ह रुग्णांनी निगेटिव्ह व्यक्तींशी विवाह करू नये" -
सीतामढीच्या एआरटी केंद्रातून दरमहिन्याला 5000 रुग्णांना औषधी पुरवली जात आहे. तर उर्वरित रुग्ण बिहारबाहेर उपचार घेत आहेत. महत्वाचे म्हणजे, पॉझिटिव्ह रुग्णांनी निगेटिव्ह व्यक्तींशी विवाह करू नये, असेही डॉ. अख्तर यांनी म्हटले आहे.
खरे तर, सरकारी पातळीवर जागरूकता मोहीम राबवली जात असली तरी रुग्णसंख्येतील वाढ चिंताजनक आहे. लहान मुलांमध्ये त्यांच्या आई वडिलांकडून संक्रमण आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने एआरटी केंद्राच्या माध्यमातून जागरूकता अभियान अधिक वेगाने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गावागावांत एचआयव्ही चाचण्या करण्याची तयारी सुरू आहे.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या माहितीनुसार, एकूण एचआयव्ही बाधितांची संख्या 6707 एवढी -
दरम्यान, सोशल मीडियावर फिरणाऱ्या माहितीनुसार, सीतामढीतील एकूण एचआयव्ही बाधितांची संख्या 6707 एवढी आहे. यांपैकी 428 मुले आहेत. महत्वाचे म्हणजे हा आकडा 1 डिसेंबर 2012 ते 1 डिसेंबर 2025 या 13 वर्षांतील असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, डिसेंबर 2025 पर्यंत बिहारमध्ये 97 हजार एड्सग्रस्त लोक आढळल्याचेही बोलले जात आहे.