डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:11 IST2025-06-12T17:11:00+5:302025-06-12T17:11:54+5:30
Ahmedabad Plane Crash: या विमानात 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनडाई नागरिक तर 7 पोर्तगालचे नागरिक बसलेले होते.

डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनच्या दिशेने झेपावलेले एअर इंडियाचे विमान (AI-171) अवघ्या 5 मिनिटांत कोसळले. या विमानात 242 प्रवासी होते, यात अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश होता. धावपट्टीवरून उड्डाण करताच हे विमान विमानतळाजवळील बीजे मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळले. यामुळे इमारतीलाही मोठी आग लागली. दरम्यान, संबंधित इमारतीतील अनेक जण जखमी झाल्याचेही बोलले जात आहे.
डॉक्टरांच्या वस्तिगृहावर कोसळलं विमान -
या दुर्घटनेनंतर, घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि पळापळ सुरू झाली. अपघातानंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये विमानाचा मागचा भाग मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहावर अडकल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
विमान इमारतीवर कोसळ्यानंतर, मोठा ब्लास्ट झाला आणि आग लागली. यानंतर सर्वत्र धूरच धूर दिसू लागला. अपघातानंतर डीजीसीएची टीम घटनास्थळी पोहोचून घटनेची चौकशी करेल. दरम्यान विमान अपघातानंतर विमानातील लोकांना बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
विमानात कोणत्या देशाचे किती प्रवासी? -
या घटनेनंतर एअर इंडियाचे निवेदनही समोर आले आहे. यात क्रॅश झालेल्या विमानात उपस्थित असलेल्या प्रवाशांसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या विमानात 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनडाई नागरिक तर 7 पोर्तगालचे नागरिक बसलेले होते.
बोइंग 787-8 ड्रीमलाइनर विमान -
अहमदाबादहून दुपारी 1:38 वाजता निघालेले हे विमान बोईंग 787-8 ड्रीमलाइनर (VT-ANB) विमान होते. जे अहमदाबाद एयरपोर्टच्या रनवे 23 वरून टेकऑफ करत होते. टेकऑफनंतर लगेचच विमानाने ATC ला ‘मेडे’ कॉल केला. मात्र यानंतर विमानाचा संपर्क तुटला. यानंतर ही दुर्घटना घडली.