बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
By नंदकिशोर पाटील | Updated: June 13, 2025 13:37 IST2025-06-13T13:35:40+5:302025-06-13T13:37:06+5:30
Ahmedabad Air India Flight AI171 Crash: गुरुवारी भारतातील अहमदाबाद शहरात झालेल्या एअर इंडिया विमान अपघातामुळे ड्रीमलाइनर ७८७-८ या विमानाच्या निर्मिती कंपनी बोइंगवर पुन्हा एकदा अमेरिकन मीडियाचे लक्ष केंद्रीत झाले आहे. अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेनंतर अमेरिकन मीडियात या विमानातील काही त्रुटींवर चर्चा सुरू झाली आहे.

बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
- नंदकिशोर पाटील
वॉशिंग्टन - गुरुवारी भारतातील अहमदाबाद शहरात झालेल्या एअर इंडिया विमान अपघातामुळे ड्रीमलाइनर ७८७-८ या विमानाच्या निर्मिती कंपनी बोइंगवर पुन्हा एकदा अमेरिकन मीडियाचे लक्ष केंद्रीत झाले आहे. अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेनंतर अमेरिकन मीडियात या विमानातील काही त्रुटींवर चर्चा सुरू झाली आहे.
बोइंगच्या मते, ७८७-८ हे विमान हे “सर्वोत्तम विक्री होणारे प्रवासी वाइडबॉडी विमान” आहे. २०११ मध्ये प्रथमच विमानसेवा कंपन्यांना वितरित झाल्यापासून हे विमान एक अब्जांहून अधिक प्रवाशांनी प्रवासासाठी वापरले आहे. आम्ही एअर इंडियाच्या फ्लाइट १७१ संदर्भात भारताच्या संपर्कात असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत. अपघातग्रस्त प्रवाश्यांचे कुटुंबीय, बचाव पथक व अन्य प्रभावित लोकांसोबत आमच्या सहवेदना आहेत, असे बोइंगने दिलेल्या निवेदनात म्हटले.
सीट अचानक पुढे सरकली अन्...
ड्रीमलाइनर ७८७-८ चा हा पहिला अपघात आहे. यापूर्वी काही चौकशी या विमानाबाबत झाली होती, असे वृत्त सीबीएस न्यूजनेदिले आहे.
सीएनएन वृत्त वाहिनीने म्हटले आहे की, गेल्या वर्षी, फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने ड्रीमलाइनरच्या कॉकपिट सीट्सची तपासणी करण्याचे आदेश दिले होते, कारण एका घटनेत पायलटची सीट अचानक पुढे सरकली व त्यामुळे ऑटोपायलट प्रणाली डिसकनेक्ट झाली होती, असे समोर आले आहे.
७७७ विमानांच्या असेंब्ली प्रक्रियेतही त्रुटी
गेल्या वर्षी बोइंगच्या एका गुणवत्ता अभियंत्याने ( व्हिसलब्लोअर), आरोप केला होता की, ड्रीमलाइनर तयार करताना कंपनीने काही शॉर्टकट घेतले, ज्यामुळे ड्रिलिंगच्या ठिकाणी मलबा उरला आणि कंपोझिट मटेरियलमध्ये विकृती निर्माण झाली.
७७७ विमानांच्या असेंब्ली प्रक्रियेतही त्रुटी असल्याचे संबंधित अभियंत्याने सांगितले होते, असे त्याच्या वकिलांनी फेडरल एव्हिएशन एडमिनिस्ट्रेशनला दिलेल्या पत्रात म्हटले होते, असा दावा सीबीएस न्यूजने केला आहे.
बोइंगवरील इतर सुरक्षा प्रश्न काय आहेत?
या अपघाताआधीही बोइंग कंपनीच्या इतर सुरक्षासंबंधी बाबी चर्चेत होत्या. विशेषतः ७३७ मॅक्स जेटलाइनरच्या २०१८ आणि २०१९ मध्ये झालेल्या दोन अपघातांमुळे कंपनीवर चौकशी व खटले दाखल झाले आहेत.त्या दोन अपघातांमध्ये एकूण ३४६ लोकांचा मृत्यू झाला होता.
मे महिन्यात, बोइंगने अमेरिकेच्या न्याय विभागासोबत १.१ अब्ज डॉलरचा करार केला. या करारामुळे २०१८ व २०१९ मध्ये झालेल्या अपघातांप्रकरणी कंपनीवर खटला चालवला जाणार आहे.
२०१४ मध्ये हे अपघातग्रस्त विमान एअर इंडियाकडे सुपूर्द करण्यात आले होते, असे सिरिअम या कंपनीने माहिती देताना सांगितले.
४१,००० तासांहून अधिक प्रवास या विमानाने आतापर्यंत पूर्ण केला आहे. तसेच सुमारे ८,००० उड्डाणे आणि लँडिंग केली होती.
८.४ वर्षे जुन्या असलेल्या १९० विमानांचा वापर एअर इंडिया करत आहे. सध्या जगभरात १,१०० हून अधिक ड्रीमलाइनर विमाने कार्यरत आहेत.