अयोध्येतील सोहळ्याआधी निर्मोही आखाडा नाराज; महंत देवेंद्र दास स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 16:12 IST2024-01-12T16:12:19+5:302024-01-12T16:12:44+5:30

गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली परंपरा यापुढेही कायम राहायला हवी परंतु ट्रस्टने आमचे म्हणणं ऐकले नाही असं त्यांनी सांगितले.

Ahead of ceremony in Ayodhya, Nirmohi Akhara upset; Mahant Devendra Das spoke clearly | अयोध्येतील सोहळ्याआधी निर्मोही आखाडा नाराज; महंत देवेंद्र दास स्पष्ट बोलले

अयोध्येतील सोहळ्याआधी निर्मोही आखाडा नाराज; महंत देवेंद्र दास स्पष्ट बोलले

अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा जसजसा जवळ येत चालला आहे तसं आयोजनावरून नाराजी पसरत चालली आहे. श्री राम जन्मभूमी मंदिर परिसरात येत्या २२ जानेवारीला होणाऱ्या सोहळ्याला शंकराचार्य उपस्थित राहणार नाहीत. तर आता रामानंद संप्रदायाचे पीठाधीश्वर यांनाही आमंत्रण न मिळाल्याने नाराज आहेत. आता नाराजांच्या यादीत निर्मोही आखाड्याचे नावही जोडले आहे. रामललाची सेवा आणि पूजेच्या विधीबाबत निर्मोही आखाडाच्या महंतांनी भाष्य केले आहे. 

निर्मोही आखाडाकडून सांगितले की, जेव्हा सुप्रीम कोर्टात अयोध्या वादावर निकाल आला तेव्हा आम्हाला मालकी हक्क मिळाला किंवा नाही मिळाला तरी पूजेचा अधिकार आम्हाला मिळायला हवा असं म्हटलं होते. तेव्हा मंदिर व्यवस्थापनासाठी ट्रस्ट जबाबदार असेल त्यांना हवे असेल तर ते निर्मोही आखाडाला पूजेचा अधिकार देऊ शकतात असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होते. अयोध्येत होणाऱ्या २२ जानेवारीच्या सोहळ्याबाबत निर्मोही आखाडाला अडचण नाही परंतु रामललाची पूजा अर्चना करण्याच्या पद्धतीवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

पूजेसाठी जी पद्धत स्वीकारण्यात आली आहे ती रामानंद परंपरेनुसार नाही. या विधी योग्य नाहीत. ५०० वर्षाहून अधिक काळापासून रामनंदी परंपरेतून रामललाची पूजा होत आली आहे. परंतु त्यात आता बदल करण्यात आलेत ते योग्य नाही. निर्मोही आखाडाचे महंत आणि राम मंदिर ट्रस्टचे सदस्य महंत देवेंद्र दास यांच्या म्हणण्यानुसार, रामनंदी परंपरेत टिळा आणि मंदिरात बनवण्यात येणारे चिन्ह वेगळ्याप्रकारे असते. गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली परंपरा यापुढेही कायम राहायला हवी परंतु ट्रस्टने आमचे म्हणणं ऐकले नाही असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, २२ तारखेच्या सोहळ्यात आम्ही उपस्थित राहणार आहे. मात्र आमच्या मनात ही सल कायम राहील. ही वेदना आम्ही सर्वांना सांगत आहोत असंही महंतांनी स्पष्ट केले. २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यानंतर देशातील भाविक भक्तांसाठी अयोध्येत प्रभू रामाचे दर्शन घेता येणार आहे. 
 

Web Title: Ahead of ceremony in Ayodhya, Nirmohi Akhara upset; Mahant Devendra Das spoke clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.