शास्त्रज्ञांचे प्रयत्न अन् लोकप्रतिनिधींच्या पाठबळातूनच कृषिक्रांती शक्य : मुख्यमंत्री

By Admin | Updated: May 12, 2014 20:56 IST2014-05-12T20:56:42+5:302014-05-12T20:56:42+5:30

Agriculture: possible by scientists' efforts and with the support of people's representatives: Chief Minister | शास्त्रज्ञांचे प्रयत्न अन् लोकप्रतिनिधींच्या पाठबळातूनच कृषिक्रांती शक्य : मुख्यमंत्री

शास्त्रज्ञांचे प्रयत्न अन् लोकप्रतिनिधींच्या पाठबळातूनच कृषिक्रांती शक्य : मुख्यमंत्री

>- दापोलीच्या कृषी विद्यापीठात कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक सुरू

दापोली : राज्यातील कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि लोकप्रतिनिधींचे पाठबळ या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यास राज्यामध्ये कृषिक्रांती घडून येण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये आयोजित केलेल्या ४२व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीला मार्गदर्शन करताना चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की, दुर्दैवाने महापूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट अशासारख्या नैसर्गिक आपत्तींना शेतकरी व शासनाला तोंड द्यावे लागले आणि प्रत्येक वेळी शासनाने आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचा हात दिला़ याचाच परिणाम सरकारच्या तिजोरीवर झाल्यामुळे राज्यातील कृषी विद्यापीठांना विविध सुविधा निर्मितीसाठी द्यावयाचे अतिरिक्त अनुदान वितरित करणे शासनाला शक्य झाले नाही.
कोकणामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त आंबा बागायतदारांना देखील प्रचलित अटी-शर्तींना अधीन राहून मदतीचा हात दिला जाईल, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. राज्यातील सामान्य माणसाची क्रयशक्ती दिवसेंदिवस वाढत असून, त्यासाठी कृषी उत्पादनाचा आलेखही सतत उंचावत ठेवणे गरजेचे आहे. विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञ आणि उत्पादक शेतकरी यामध्ये मोठी भूमिका बजावू शकतात, असेही ते म्हणाले़
यावेळी विद्यापीठाचे प्रतिकुलपती आणि राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदामंत्री सुनील तटकरे, पालकमंत्री आणि नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, राज्यातील चारही विद्यापीठांचे कुलगुरू, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक, वानखेडे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक मारुती सावंत, विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, आनंद कोठडीया, बकवाड, हुस्नबानू खलिफे, चारही विद्यापीठांचे संशोधन संचालक आणि दापोलीच्या नगराध्यक्षा विनीता शिगवण उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विखे-पाटील म्हणाले की, हवामान अंदाज, पीक विमा योजना, पीकसंरक्षण यांसारख्या विषयांवर आधारित शिफारशीदेखील या बैठकीच्या माध्यमातून देण्यात याव्यात. तसेच जैवतंत्रज्ञानासारख्या शास्त्राचा वापर करून उत्पादन खर्च कमी करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहण्यात यावी. उदय सामंत आणि सुनील तटकरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि बैठकीस शुभेच्छा दिल्या. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किसन लवांडे यांनी प्रास्ताविक केले.
संशोधनपर उत्कृष्ठ लेखाचा पुरस्कार यावेळी डॉ. दत्तात्रय लाड यांना मुख्यमंत्र्यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. तसेच चारही विद्यापीठांनी निर्माण केलेल्या विविध प्रकाशनांचे विमोचनही पार पडले. राज्यातील गारपीटग्रस्तांना मदतीचा हात म्हणून विद्यापीठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी देऊ केलेल्या एक दिवसाच्या वेतनाच्या रकमेचा धनादेश यावेळी कुलगुरू डॉ. किसन लवांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. बैठकीच्या उद्घाटन समारंभापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विद्यापीठाच्या वॉटरशेड पार्क, इंडो ईस्रायल प्रकल्प, आदी विभागांना भेटी दिल्या. तसेच बैठकीच्या ठिकाणी आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनासही भेट दिली.
संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर यांनी आभार मानले. जैवतंत्रज्ञान कक्षाचे प्रभारी अधिकारी डॉ. एन. बी. गोखले यांनी सूत्रसंचालन केले़. या बैठकीला राज्यातून सुमारे २० शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी उपस्थित असून, तीन दिवस चालणार्‍या तांत्रिक सत्रामध्ये एकूण ११ गटांमध्ये संशोधन विषयक चर्चा होणार आहे. (प्रतिनिधी)

फोटो आहे.
फाईल
१२०५२०१४-आरटीएन-०१
कॅप्शन
दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Agriculture: possible by scientists' efforts and with the support of people's representatives: Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.