अग्निवीर मुरली नाईक यांनी वयाच्या २३ व्या वर्षी भारत-पाकिस्तान सीमेवर (LoC) शौर्य दाखवून देशासाठी आपलं बलिदान दिलं. ९ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान सीमेवर पाकिस्तानी गोळीबारात मुरली नाईक यांनी आपला जीव गमावला. आज त्यांचं पार्थिव आंध्र प्रदेशातील गोरंटला मंडलमधील त्यांच्या कल्लिथंडा गावात पोहोचलं.
लहानपणापासूनच पाहिलेलं देशसेवा करण्याचं स्वप्न
८ एप्रिल २००२ रोजी जन्मलेले अग्निवीर मुरली नाईक यांनी लहानपणापासूनच देशसेवा करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. डिसेंबर २०२२ मध्ये, वयाच्या २० व्या वर्षी, अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात सामील होऊन त्यांनी आपलं स्वप्न साकार केलं. नाशिकमध्ये ६ महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर, त्यांनी आसाममध्ये १ वर्ष सेवा बजावली आणि सध्या त्यांची पोस्टिंग पंजाबमध्ये होती.
पालकांशी फोनवर साधलेला संवाद
'ऑपरेशन सिंदूर' मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या मुरली यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पालकांशी फोनवर संवाद साधला होता, ज्यामध्ये त्यांनी युद्धात सहभागी होण्याबद्दल सांगितलं होतं. त्यांची देशभक्ती आणि सैन्याप्रती असलेल्या समर्पणामुळे त्यांना स्पेशल ऑपरेशन्स फोकस कॅडर (AV-OPR) मध्ये स्थान मिळालं.
मुरली नाईक हे त्यांचे आईवडील श्रीरामुलु नाईक आणि ज्योतीबाई यांचे एकुलते एक पुत्र होते. २०१६-१७ मध्ये समंडेपल्ली येथून दहावी उत्तीर्ण झाले. मुरली यांनी त्यांच्या पालकांना सांगितलं होतं की, ते ४ वर्षांची सेवा पूर्ण करून २०२६ मध्ये घरी परत येतील, परंतु त्यांनी देशासाठी आपलं जीवन अर्पण केलं. जर शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात गुंडाळलं जावं अशी त्यांची इच्छा होती. मुरली नाईक यांचा संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे.
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील सुरेंद्र मोगा शहीद झाले. त्यांची ११ वर्षांची मुलगी वर्तिका हिने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. माझे पप्पा खूप चांगले होते. शत्रूंचा खात्मा करून ते स्वतः शहीद झाले. माझ्या पप्पांनी देशाचं रक्षण केलं आहे. मी रात्री ९ वाजता पप्पांशी शेवटचे बोलले होते. मी पप्पांना सांगितलेलं की, इथे ड्रोन उडत आहेत, पण कोणतेही हल्ले होत नाहीत. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. पाकिस्तानचा खात्मा झाला पाहिजे. मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि माझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईन. मी दहशतवाद्यांना मारेन."