After the violence in the tractor rally, the farmers took a big decision regarding the agitation | ट्रॅक्टर रॅलीमधील हिंसाचारानंतर शेतकरी नेत्यांनी आंदोलनाबाबत घेतला मोठा निर्णय

ट्रॅक्टर रॅलीमधील हिंसाचारानंतर शेतकरी नेत्यांनी आंदोलनाबाबत घेतला मोठा निर्णय

ठळक मुद्देकृषी कायद्यांविरोधातील आंदोलन दीर्घकाळ चालणार आहेआंदोलनात हिंसाचार करणाऱ्यांशी आमचे काहीही देणेघेणे नाहीदीप सिद्धू आणि काही लोकांनी शांततापूर्ण आंदोलनाला बदनाम केले

नवी दिल्ली - काल प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याने कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले आहे. आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यापर्यंत दिलेली धडक तसेच अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसक झटापटी झाल्याने या आंदोलनावर टीका होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सिंधू बॉर्डरवर शेतकरी नेते गोळा झाले. तसेच कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत मोठा निर्णय घेतला. कृषी कायदे मागे घेईपर्यंत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतला आहे.

प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. तसेच ठिकठिकाणी शेतकरी आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. दिवसभर झालेल्या हिंसाचारात सुमारे ३०० हून अधिक पोलीस जखमी झाले. दरम्यान, आज सिंघू बॉर्डरवर शेतकरी नेते जमा झाले. तसेच त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करून शांततेत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

यावेळी शेतकरी नेत्यांनी सांगितले की, हे आंदोलन दीर्घकाळ चालणार आहे. काल आंदोलनात हिंसाचार करणाऱ्यांशी आमचे काहीही देणेघेणे नाही. दीप सिद्धू आणि काही लोकांनी शांततापूर्ण आंदोलनाला बदनाम केले. काही शेतकरी नेत्यांनी आंदोलनाला काळीमा फासण्याचे काम केले आहे. दीप सिद्धू हा सरकारचा माणूस आहे. हे लोक लाल किल्ल्यापर्यंत कसे पोहोचले, पोलिसांनी त्यांना का जाऊ दिले हे जाणून घेण्याची गरज आहे, असा आरोपही शेतकरी नेत्यांनी केला.

संयुक्त मोर्चामधील काही शेतकरी नेत्यांनी सांगितले की, काही लोकांना पाठीमागून वार करण्याचे काम केले आहे. ज्यांनी मंगळवारी लाल किल्ल्यामध्ये चुकीचे वर्तन केले ते योग्य म्हणता येणारे नाही. त्यांनी ६० दिवसांच्या आंदोलनाला बदनाम केले आहे. लाल किल्ल्यावर ज्यांनी झेंडा फडकवला ते गद्दार आहेत. लालकिल्ल्यावर तिरंग्याच्या जागी शीख समाजाचा ध्वज फडकवणे चुकीची बाब आहे. यामुळे कृषी आंदोलनाला धक्का बसला आहे, अशी टीकाही शेतकरी नेत्यांनी केली.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After the violence in the tractor rally, the farmers took a big decision regarding the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.