नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या नेत्यांसोबत शरद पवारांची दिल्ली निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासोबत इतर राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचं बोलले गेले. त्यानंतर आज शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या.
मोदींच्या भेटीनंतर पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले की, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या काही समस्या होत्या, त्यावर पंतप्रधानांशी चर्चा केली. राजकीय चर्चा झाली नाही. फक्त ५ मिनिटांची भेट होती असं त्यांनी सांगितले. साताऱ्यातील २ डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी आधुनिक प्रयोग करून शेती केली. त्या शेतकऱ्यांसोबत शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतली.
भेटीआधी पवारांचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना फोन
तब्बल ७० वर्षांनंतर देशाची राजधानी दिल्लीत होणारे ९८ वे मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली. ‘सरहद’ संस्थेने अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन दिल्लीत केले आहे. संमेलन तालकटोरा स्टेडियममध्ये २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार आहे.
या संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावं यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेतला आहे. पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना याबाबत फोन केले. त्यात पंतप्रधानांशी चर्चा होऊ शकली नाही. मात्र, उद्घाटन करणार याचे स्वीकृतीपत्र द्यावे, असे पंतप्रधानांच्या सचिवांसोबत बोलणे झाले अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर बुधवारी संसद भवनात शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतली त्यातही साहित्य संमलेनाच्या उद्धाटनावर चर्चा झाल्याची शक्यता आहे.
ठाकरे - फडणवीस भेट
विधानसभा निवडणुकीत प्रचारात एकमेकांवर टोकाची टीका करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हिवाळी अधिवेशनात भेट झाली. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरेंनी पहिल्यांदाच पुष्पगुच्छ घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. विधान भवनात मुख्यमंत्री कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. दोघांनी हस्तांदोलन केले. अनेक महिन्यांनंतर हे दोन नेते एकमेकांना भेटले. यावेळी उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे, भाचे आ. वरुण सरदेसाई, माजी मंत्री भास्कर जाधव, अनिल परब आदी उपस्थित होते. त्यानंतर फडणवीस व ठाकरे यांच्यात बंदद्वार चर्चा झाली.