मुंबई स्फोटानंतर टायगर मेमनला भेटलो होतो
By Admin | Updated: July 31, 2015 23:55 IST2015-07-31T23:55:05+5:302015-07-31T23:55:05+5:30
वाद उफाळला: जम्मू-काश्मीरचे काँग्रेस आमदार उस्मान मजीदचा दावा

मुंबई स्फोटानंतर टायगर मेमनला भेटलो होतो
व द उफाळला: जम्मू-काश्मीरचे काँग्रेस आमदार उस्मान मजीदचा दावाश्रीनगर: मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर आपण पाकव्याप्त काश्मिरात टायगर मेमनला भेटलो होतो, असा दावा पूर्वाश्रमीचा दहशतवादी आणि आता काँग्रेसचे आमदार असलेले उस्मान मजीद यांनी शुक्रवारी केल्याने एक नवा वाद उफाळून आला आहे.त्यावेळी टायगर त्याचा भाऊ याकूबच्या आत्मसमर्पणाने चिंतित होता. आयएसआय याकूबची हत्या करेल अशी भीती त्याला होती,असाही गौप्यस्फोट आ. मजीद यांनी केला आहे.याकूबला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फासावर लटकविण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मजीद यांनी हा दावा केला आहे. टायगर हा मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे. उत्तर काश्मीरच्या बांदीपुरा येथील आमदार असलेले मजीद यांनी सांगितले की, १९९३ साली दोन ते तीन वेळा टायगरला भेटले होते. तो मुजफ्फराबाद(पीओकेची राजधानी) येथील आमच्या कार्यालयात आला होता. माझी त्याच्याशी मैत्री नव्हती. स्टुडंटस् लिबरेशन फ्रंटचा संस्थापक आणि इखवान- उल- मुस्लिमीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हिलाल बेग याने माझा टायगरशी परिचय करुन दिला होता. टायगरची भेट होण्यापूर्वीच त्याने मुंबईत बॉम्बस्फोट घडविले होते,असाही दावा त्यांनी केला.तेव्हा तो आमच्या देशात मोस्ट वॉन्टेड होता. बॉम्बस्फोट का घडविले, अशी विचारणा मी त्याला केली होती. यावर बाबरी मशीद पाडणे आणि त्यानंतरच्या दंगली हे मुख्य कारण असल्याचे त्याने आपल्याला सांगितले होते. त्याकाळात महिलांसह अनेक लोक आपल्याकडे आले होते आणि त्यांनी हत्या होत असल्याचे सांगितल्यानंतर आपण भावूक झालो आणि बॉम्बस्फोट केले,अशी कबुली टायगरने दिली होती,असाही दावा काँग्रेस आमदाराने केला आहे.मुंबई बॉम्बस्फोटाचा कट आणि त्याच्या अंमलबजावणीत पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयने आपल्याला मदत केल्याचेही टायगरने मजीद यांना सांगितले होते.टायगरच्या सांगण्यानुसार,सर्व काही पाकिस्तानने केले होते. कटाची आखणी आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठाही पाकनेच केला होता. आयएसआयच्या निर्देशानुसार टायगर टोळीने हा कट अमलात आणला होता.याकूब परतल्यानंतर टायगरही आत्मसमर्पण करेल अशी भीती पाकिस्तानला होती. त्यामुळे आयएसआय त्याच्याकडे संशयाने बघत होती. पाकिस्तानात आता आपल्याला पूर्वीपेक्षा कमी आदर मिळत असल्याचीही खंत टायगरने व्यक्त केली होती,असे मजीद यांचे म्हणणे आहे. आमदाराच्या सांगण्यानुसार याकूबच्या आत्मसमर्पणानंतर टायगरने पाकिस्तान सोडले होते. कारण आयएसआयकडून आपली हत्या होईल, अशी भीती त्याला वाटत होती. तो दुबईला गेला होता. पण बोलणी झाल्यावर आयएसआयने त्याला परत बोलावले. (वृत्तसंस्था)