गेल्या काही दिवसांपासून देशात गुइलेन बॅरे सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) म्हणजेच जीबीएस आजाराचा कहर सतत वाढत आहे. हा आजार आता राज्या-राज्यात पसरू लागला आहे. महाराष्ट्रानंतर आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत. तर जीबीएसमुळे पश्चिम बंगालमध्ये गेल्या चार दिवसांत एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, येथील आरोग्य विभागाने अद्याप मृत्यूचे कारण अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये उत्तर २४ परगणा येथील जगद्दल येथील रहिवासी देबकुमार साहू (१०), अमडंगा येथील रहिवासी अरित्र मनाल (१७) आणि हुगळी जिल्ह्यातील धनियाखली गावातील ४८ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. देबकुमार साहू याचे २६ जानेवारीला कोलकात्याच्या बीसी रॉय हॉस्पिटलमध्ये निधन झाले, तर शहरातील एनआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अमडंगा येथील अरित्र मनाल यांचे दुसऱ्या दिवशी निधन झाले. हुगळी येथील व्यक्तीचा बुधवारी तेथील स्थानिक हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
देबकुमार साहू याचे काका गोविंद साहू म्हणाले की, हॉस्पिटलद्वारे आम्हाला सांगितले आले नाही की, त्याचा मृत्यू जीबीएसमुळे झाला. परंतु त्याच्या मृत्यू प्रमाणपत्रात जीबीएसचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित जीबीएसने ग्रस्त असलेल्या आणखी चार मुलांवर बीसी रॉय हॉस्पिटल आणि चाइल्ड हेल्थ इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण पुण्यातमहाराष्ट्रात जीबीएस रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये हा आजार पसरला आहे. आतापर्यंत जीबीएसमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १२७ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच, या आजाराने ग्रस्त २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. दरम्यान, बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, पोटदुखी, उलटी, जुलाब, अशक्तपणा जाणवल्यास तत्काळ औषधोपचार घ्यावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.