Mahua Moitra Controversy: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्ध केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल छत्तीसगडमधील रायपूर येथे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अमित शाह यांचे शीर धडापासून वेगळे केले पाहिजे आणि ते प्रदर्शनार्थ टेबलावर ठेवले पाहिजे, असं विधान खासदार महुआ मोइत्रांनी केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. मात्र आता टीएमसी खासदाराने या बाबत स्पष्टीकरण देत भाजपवर टीका केली. मूर्खांना म्हणी समजत नाही, असं महुआ मोइत्रा म्हणाल्या.
घुसखोरीच्या मुद्द्यावरुन केंद्रावर टीका करताना महुआ मोइत्रा यांनी हे विधान केल्याचे म्हटलं जात आहे. घुसखोर देशात येत आहेत आणि महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान करत आहेत. जर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घुसखोरांपासून देशाचे रक्षण करू शकत नसतील तर त्यांचे डोके कापून टेबलावर ठेवले पाहिजे, असं विधान मोइत्रांनी केलं. त्या विरोधात भाजपने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यावर आता पुन्हा एकदा महुआ मोइत्रांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
महुआ मोइत्रा यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की ही फक्त एक म्हण आहे आणि माझ्या शब्दांमुळ गैरसमज झाला आहे. "मूर्खांना म्हणीसुद्धा समजत नाहीत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर, परदेशी माध्यमांनी केवळ २४० जागा ही नरेंद्र मोदींच्या तोंडावर थप्पड आहे असं म्हटलं. मग कोणीतरी जाऊन पंतप्रधान मोदींना मारली का? भाजप तोंडावर पडला? हे फक्त एक वाक्य आहे. त्याचप्रमाणे, बंगाली भाषेत याचा अर्थ असा होतो की एखाद्याला इतकी लाज वाटते की त्याला डोके टेकवावे लागते. याचा अर्थ जबाबदारी स्वीकारणे. ही फक्त एक म्हण आहे," असं मोइत्रा म्हणाल्या.
काय म्हणाल्या महुआ मोइत्रा?
"अमित शाह यांचे डोके कापून टेबलावर ठेवले पाहिजे कारण ते बेकायदेशीर बांगलादेशींची घुसखोरी रोखण्यात अपयशी ठरले आहेत. ते (अमित शाह) फक्त घुसखोरांबद्दल बोलत आहेत. भारतीय सीमेची सुरक्षा ही गृह मंत्रालयाची जबाबदारी आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून सांगितले की घुसखोरी होत आहे ज्यामुळे लोकसंख्या बदलत आहे, तेव्हा गृहमंत्री पुढच्या रांगेत बसून टाळ्या वाजवत होते आणि हसत होते. भारतीय सीमेचे रक्षण करणारे कोणीही नाही," असं मोइत्रा म्हणाल्या होत्या.
दरम्यान, शनिवारी माना पोलिस ठाण्यात मोइत्रा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १९६ आणि १९७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.