सर्वोच्च न्यायालयाच्या दिल्लीतील निर्णयानंतर राजस्थानच्याउच्च न्यायालयाने देखील भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थान हायकोर्टाने देखील भटक्या कुत्र्यांमुळे आणि पशुंमुळे वाढत चाललेल्या धोक्यावर स्वत: दखल घेत हे निर्देश जारी केले आहेत. यामुळे आता महाराष्ट्रात विशेषकरून मुंबई, पुण्यासारख्या शहरांत अशाप्रकारचे आदेश जारी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकदा रस्त्यावरून चालत जाणारे लोक, रहिवासी, स्कूटरस्वार जखमी झालेले आहेत. अपघात झालेले आहेत. लहान मुलांचे लचके या भटक्या कुत्र्यांनी तोडलेले आहेत. यामुळे रेबिज वाढत चालला आहे. काही वर्षांपूर्वी एका मुलाला त्याचा बाप मांडीवर घेऊन असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा मुलगा कुत्र्यासारखा भुंकत, ओरडत होता. त्या मुलाने बापाच्या मांडीवर प्राण सोडले होते. तक्रारी केल्या तरी पालिका प्रशासन अशा भटक्या कुत्र्यांवर काहीच कारवाई करत नाही, यामुळे आता न्यायालयेच स्वत: दखल घेऊ लागली आहेत.
राजस्थान उच्च न्यायालयाने राज्यभरात भटक्या कुत्र्यांच्या आणि इतर प्राण्यांच्या वाढत्या धोक्याची स्वतःहून दखल घेतली. बातम्यांची दखल घेत सरकारला अॅमिकस क्युरीच्या अहवालावर उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. न्यायमूर्ती कुलदीप माथूर आणि न्यायमूर्ती रवी चिरानिया यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. वरिष्ठ वकील डॉ. सचिन आचार्य, वकील प्रियंका बोराणा आणि वकील हेली पाठक यांनी आपली बाजू मांडली.
नागरिकांच्या सुरक्षित हालचाली सुनिश्चित करणे हे महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि इतर संबंधित संस्थांचे वैधानिक कर्तव्य आहे असे वकिलांनी म्हटले. वैधानिक कर्तव्या असूनही, संबंधित अधिकाऱ्यांच्या घोर निष्काळजीपणामुळे आणि कर्तव्यांचे पालन न केल्यामुळे, भटक्या प्राण्यांकडून हल्ले आणि चावण्याच्या घटनांमध्ये अनेक पटीने वाढ झाली आहे. यामुळे राज्यातील मानवी जीवनाला धोका निर्माण होत आहेच, शिवाय देशभरातूनच नव्हे तर जगभरातील विविध देशांमधून येणाऱ्या पर्यटकांवर हल्ले झाल्याने राज्याच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचत असल्याचे वकिलांनी म्हटले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे एम्स जोधपूरने प्रियंका बोराना यांना आपल्या कर्मचाऱ्यांवर कुत्र्यांनी हल्ले केल्याचे पत्र लिहून कळविले होते. याच्या बातम्या प्रकाशित झाल्याने अखेर कोर्टाने याची दखल घेत कारवाईचे निर्देश दिले आहेत. शहरातील रस्त्यांवरून भटके कुत्रे आणि इतर प्राणी हटविण्यासाठी मोहिम सुरु करण्यास सांगतिले आहे. तसेच कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध संबंधित कायद्यानुसार एफआयआर नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महानगरपालिका हेल्पलाइन नंबर-ईमेल आयडी जारी करण्यास सांगितले आहे.