मृत्यूनंतर घरच्यांनी अन् गावकऱ्यांनी पाठ फिरवली; महिला तहसिलदाराने PPE किट्स घालून केले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 18:37 IST2021-05-11T18:35:27+5:302021-05-11T18:37:32+5:30
स्वत: तहसिलदार रजनी यादव यांनी पीपीई किट्स घालून महिलेवर अंत्यसंस्कार केले.

मृत्यूनंतर घरच्यांनी अन् गावकऱ्यांनी पाठ फिरवली; महिला तहसिलदाराने PPE किट्स घालून केले अंत्यसंस्कार
सीकर – कोरोना महामारीची दुसरी लाट युवकांसाठी सर्वात घातक बनून आली आहे. या लाटेत अनेक युवकांचा मृत्यूही झाला आहे. राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात धोद येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. याठिकाणी एका महिलेच्या मृत्यू तिच्या अंत्यसंस्कारासाठी ना तिच्या घरातले समोर आले, ना गावातील कोणी ना मेडिकल टीमपैकी कोणी पुढं सरसावलं. या महिलेच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी धोद तहसिलदार रजनी यादव यांनी सांभाळली.
स्वत: तहसिलदार रजनी यादव यांनी पीपीई किट्स घालून महिलेवर अंत्यसंस्कार केले. खळबळजनक म्हणजे ज्यावेळी या महिलेच्या मृत्यूची सूचना मिळाली तेव्हा तहसिलदार तिच्या घरी पोहचली तेव्हा महिलेच्या मृतदेहाशेजारी २ लहान मुलांशिवाय कोणीही नव्हतं. सीकर जिल्ह्यातील किरडोली परिसरात एका महिलेचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोरोनाशी निगडीत आहे की नाही याबाबत स्पष्टता नाही. कारण या महिलेची कोविड चाचणी झाली नव्हती. मृत्यूनंतर स्थानिक सरपंचांनी त्याची माहिती तहसिलदार रजनी यादव यांना दिली.
रजनी यादव जेव्हा मृतकाच्या घरी पोहचली त्यानंतर विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून एम्ब्युलन्स मागवली पण कोणीही मदत केली नाही. कोरोना संशयित असल्याने मेडिकलपासून पोलिसांपर्यंत अनेकांनी मौन बाळगणं पसंत केले. फोन करूनही रुग्णवाहिका पोहचलीच नाही. त्यानंतर तहसिलदार स्थानिक गाडीचा सहारा घेत कसंतरी त्याला मृतदेह घेऊन जाण्यासाठी तयार केले.
त्यानंतर तहसिलदाराने गाडी चालकाला स्वत:सोबत येण्यास सांगितलं आणि पीपीई किट्स मागवले. महिलेचा पती आणि मुलांना रस्त्यावर पीपीई किट्स घालून स्वत:ही PPE किट्स घातलं. त्यानंतर स्मशानभूमीत जाऊन या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तहसिलदार रजनी यादव म्हणाल्या की, मी जेव्हा मृत महिलेच्या घरी पोहचले तेव्हा तिच्या घराबाहेर गावकरी जमले होते परंतु कोणीही पुढे यायला तयार नव्हतं. जेव्हा मी पीपीई किट्स घालून पुढे मदतीसाठी गेले तेव्हा अनेकांनी व्हिडीओ काढले परंतु मदतीसाठी पुढे आलं नाही.