मेघालयमधून मोठा कोळसा घोटाळा समोर येत आहे. थोडा थोडका नव्हे तर ४००० टन कोळसा गायब झाला आहे. यावरून हायकोर्टाने फटकारताच राज्याच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रात जसे खेकड्यांनी धरण पोखरल्याचे कारण सांगितले गेले, तसे हास्यास्पद कारण दिले आहे. हजारो टन कोळसा म्हणजे पावसाच्या पाण्यात वाहून गेला असेल असे मेघालयच्या मंत्र्यांनी म्हटले आहे.
सोमवारी माध्यमांशी बोलताना उत्पादन शुल्क मंत्री किरमेन शिल्ला यांनी हायकोर्टाच्या निर्देशांवर हे वक्तव्य केले आहे. न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले असतानाच या कोळशाची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर होती त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मेघालय उच्च न्यायालयाने राजाजू आणि डिएंगनागाव गावांमधून कोळसा गायब झाल्याबद्दल राज्य सरकारला फटकारले होते. तसेच बेकायदेशीरपणे कोळसा उचलणाऱ्यांचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने कोळशाचे निरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
यावर शिल्ला यांनी दावे सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे आवश्यक आहेत आणि अशा कारवायांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी अनेक विभागांची आहे. जर आपल्या लोकांना जगण्यासाठी हे करावे लागत असेल तर ते बेकायदेशीरपणे चोरी करू शकतात असे मला वाटते. अन्यथा कोणीही राज्याचे नुकसान करेल असे वाटत नाही. मी फक्त पावसाला दोष देऊ शकत नाही. पावसात वाहून गेला ते खरे असू शकते, असे म्हटले आहे.