बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:18 IST2025-08-05T16:18:11+5:302025-08-05T16:18:46+5:30
SIR Process Begins In West Bengal: बिहारनंतर आता पश्चिम बंगालमध्येही मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे.

बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश
बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात मतदार याद्यांचं पुनरीक्षण करण्याची घोषणा केली होती. मात्र मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोग आणि विरोधी पक्ष आमने-सामने आले होते. तरीही निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या पुनरीक्षणांचं काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण केलं आहे. दरम्यान, बिहारनंतर आता पश्चिम बंगालमध्येही मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे. तसेच राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, आधीच बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनरीक्षणावरून वाद निर्माण झाला असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची घोषणा केल्याने हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. यासंदर्भातील एसआयआर प्रक्रियेंतर्गत राज्यामध्ये १ ऑगस्ट रोजी सुधारित मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच मतदार याद्यांच्या पुनरीक्षणामधून सुमारे ६५ लाख अपात्र मतदारांची नावं मतदार यादीमधून हटणार आहेत. यामधील बहुतांश मतदार हे अपात्र ठरले आहेत. यापैकी बहुतांश मतदार हे मृत आहेत. तर काही जणांनी दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत झालेले आहेत. तर काही मतदारांचं एकापेक्षा अधिक मतदारसंघांमध्ये नाव आहे.