शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

तालिबान्यांना चकवून रझियाचं भारतात गोल्ड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 12:36 IST

महिलांच्या कर्तृत्वाला कोणतीही सीमा नाही, हे महिलांनी आपल्या क्षमतेनं वेळोवेळी दाखवून दिलं आहे. प्रत्येक क्षेत्रावर त्यांनी आपली मोहोर उमटवली आहे.

महिलांच्या कर्तृत्वाला कोणतीही सीमा नाही, हे महिलांनी आपल्या क्षमतेनं वेळोवेळी दाखवून दिलं आहे. प्रत्येक क्षेत्रावर त्यांनी आपली मोहोर उमटवली आहे. स्वत:ला ‘सिद्ध’ करण्यासाठी एकही क्षेत्र त्यांनी आता ठेवलेलं नाही, तरीही महिलांना अनेक समाजात, देशात पुरुषांपेक्षा कमी समजलं जातं, त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते, त्यांचा योग्य तो सन्मान केला जात नाही, इतकंच काय, त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदलाही दिला जात नाही. 

अफगाणिस्तानसारख्या देशात महिलांना अतिशय दयनीय अवस्थेत जगावं लागतं आहे. तिथे तालिबान पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आपले सरंजामी कायदे पुन्हा लागू केले  आणि स्त्रियांचे सारेच अधिकार हिरावून घेतले आहेत.अफगाणिस्तानात महिलांना शिक्षण घेता येत नाही, त्यांना नोकरी करता येत नाही, एकट्यानं बाहेर फिरता येत नाही. खेळता येत नाही. नैतिकतेच्या नावाखाली  चार भिंतींच्या कोठडीत त्यांना अक्षरश: डांबून ठेवलं जातं. संस्कृतीरक्षणाची मशाल हाती घेतलेले हे स्वयंघोषित नेते एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी महिलांना मारहाण, जाहीर फटके, तुरुंगवास, अगदी दगडानं ठेचून मारण्यापर्यंत.. काहीही बाकी ठेवलं नाही; पण तिथेही महिलांनी आपली हिंमत हरलेली नाही. अन्यायाविरुद्धची मशाल त्यांनी अजूनही पेटतीच ठेवली आहे. 

त्याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे रझिया मुरादी. काहीही झालं तरी मला शिकायचंच या ध्येयानं पछाडलेली ही एक जिद्दी तरुणी. आपल्या देशात आपल्याला शिक्षण घेता येणार नाही, घ्यायचा प्रयत्न केला, तर संस्कृतीरक्षक आपल्याला जगू देणार नाहीत, कुठल्यातरी अंधारकोठडीत आपला मृत्यू होईल किंवा आपल्याच शहरातून, घरातून पुन्हा कधीही न दिसण्यासाठी आपल्याला गायब केलं जाईल, याची रझियाला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे शिक्षणासाठी तिनं भारतात येण्याचा निर्णय घेतला. रझिया एकटीनं भारतात कशी येणार, कुठे राहाणार, काय करणार.. असे असंख्य प्रश्न तिच्या पालकांसमोरही होते; पण शिक्षण घेण्याच्या तिच्या जिद्दीला आणि निर्णयाला त्यांचीही सहमती होती. छातीवर दगड ठेवून त्यांनी तिला परवानगी दिली. कारण त्यांनाही माहीत होतं, आपली मुलगी भले आपल्या डोळ्यांसमोर नसेल, आपली आणि तिची पुन्हा कधी भेट होईल, हे माहीत नाही; पण इथल्यापेक्षा भारतातच ती अधिक सुरक्षित असेल, तिथेच तिची प्रगती होऊ शकेल.. इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सची (ICCR) शिष्यवृत्ती मिळवून २०२० मध्ये महत्प्रयासांनी रझिया भारतात, सुरतमध्ये पोहोचली. 

तिथल्या दक्षिण गुजरात वीर नर्मद युनिव्हर्सिटीमध्ये तिनं एमएसाठी प्रवेश घेतला. तिच्या अभ्यासाचा विषय होता पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. भारतात आल्यानंतर एकटीनं राहात असताना आर्थिक चणचणीसह सगळ्या अडथळ्यांवर मात करत जिद्दीनं तिनं अभ्यास सुरू ठेवला. त्याचंच फळ तिला मिळालं. विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाची सर्वांत स्कॉलर विद्यार्थिनी म्हणून तिला गौरवण्यात आलं. कारण एम. ए. ला तिच्या विषयात तिनं सुवर्णपदक  मिळवलं होतं. 

सुवर्णपदक स्वीकारल्यानंतर रझियाच्या एका डोळ्यांत हसू होतं, तर दुसऱ्या डोळ्यांत अश्रू. कारण तिनं मिळवलेलं हे यश प्रत्यक्ष पाहण्यासाठी तिचे कुटुंबीय, तिचे पालक, भावंडं तिच्या सोबत नव्हते. भारतात आल्यानंतर एकदाही ती आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानात जाऊ शकली नाही. अर्थात हे तिला आणि तिच्या कुटुंबीयांनाही माहीत होतं. रझियाच्या यशाबद्दल तिच्या शिक्षिका मधू थवानी म्हणतात, रझिया केवळ गुणवंत विद्यार्थिनीच नाही, अफगाणिस्तानातील आणि इतरही महिला विद्यार्थ्यांसाठी तिनं एक आदर्श घालून दिला आहे. ज्या परिस्थितीत तिनं हे यश मिळवलं, त्यामुळे त्याचं मोल अधिकच वाढतं. ती एक धडाडीची सांस्कृतिक कार्यकर्ती आणि थिंक टँक आहे.

सूरतमध्ये राहूनच रझिया आता पीएच.डी करते आहे. रझिया म्हणते, माझी पीएच.डी पूर्ण होईपर्यंत अफगाणिस्तानातील परिस्थिती बदललेली असेल आणि मला पुन्हा माझ्या मायदेशात जाता येईल, अशी मला आशा आहे. विकास आणि पुनर्वसनाच्या क्षेत्रात काम करून मला माझ्या देशात सकारात्मक बदल घडवायचा आहे.

भारताचे आभार कुठल्या शब्दांत मानू? आपल्या यशात भारताचा खूप मोठा वाटा आहे, असं रझिया कृतज्ञतेनं नमूद करते. तालिबानी धमक्यांना न घाबरता रझिया जाहीरपणे सांगते, माझ्या देशात तालिबान्यांनी महिलांच्या शिक्षणावर घातलेला प्रतिबंध आणि त्यांच्यावर ते करीत असलेले अत्याचार ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. माझ्यासारख्या असहाय मुलीला सर्वतोपरी आधार देणारं भारत सरकार, ICCR, माझं विद्यापीठ, या विद्यापीठातले माझे मित्र- मैत्रिणी, भारतीय लोक यांचे आभार कुठल्या शब्दांत मानावेत हेच मला कळत नाही.

 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानGujaratगुजरात