आयसीसीआरसाठी अडवाणींनी बांधले बाशिंग
By Admin | Updated: August 25, 2014 23:37 IST2014-08-25T23:37:44+5:302014-08-25T23:37:44+5:30
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी या प्रतिष्ठित परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत उत्सुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आयसीसीआरसाठी अडवाणींनी बांधले बाशिंग
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. करणसिंग यांनी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, या पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे.
ही परिषद ज्यांच्या अखत्यारीत येते त्या विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी ही परिषद नेतृत्वहीन झाल्याची माहिती पंतप्रधानांना दिली आहे. ही परिषद न गुंडाळता पुनर्रचना करण्याचे संकेत मोदींनी दिले आहेत. संभाव्य नावांवर चर्चा झाली की नाही, ते अद्याप कळू शकले नाही. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी या प्रतिष्ठित परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत उत्सुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोदींसोबत झालेल्या एका बैठकीत हे पद अडवाणी यांना द्यावे, असे सुचविले होते.डॉ.करणसिंग यांना सामावून घेताना संपुआने हाच मार्ग निवडला होता.
किरण खेर यांचे नावही चर्चेत
अध्यक्षपदासाठी चंदीगडच्या खासदार किरण खेर यांच्यासह एका माजी विदेश सचिवाचे नावही चर्चेत आहे, पण अद्याप निर्णय झालेला नाही. संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्षपद अडवाणींना दिले जाणार होते, मात्र त्यांनी नकार दिल्यामुळे डॉ. मुरलीमनोहर जोशी यांच्या गळ्यात माळ पडली.
तिसरे मंडळ अध्यक्षांविना...
प्रतिष्ठित असे तिसरे मंडळ नेतृत्वहीन झाले आहे. योजना आयोग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानंतर आयसीसीआर या तिसऱ्या मंडळाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला असून, या सर्वांचे कामकाज ठप्प पडले आहे.