Aditya Thackeray: महाराष्ट्राची दारं तुमच्यासाठी खुली, शिवसेनेनं पीडित कश्मिरी पंडितांना दिला धीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 12:22 IST2022-06-10T12:21:52+5:302022-06-10T12:22:49+5:30

काश्मिर खोऱ्यातून शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे.

Aditya Thackeray: The doors of Maharashtra are open for you, Shiv Sena has given patience to the afflicted Kashmiri Pandits | Aditya Thackeray: महाराष्ट्राची दारं तुमच्यासाठी खुली, शिवसेनेनं पीडित कश्मिरी पंडितांना दिला धीर

Aditya Thackeray: महाराष्ट्राची दारं तुमच्यासाठी खुली, शिवसेनेनं पीडित कश्मिरी पंडितांना दिला धीर

श्रीनगर - कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. गेल्या काही दिवसांपासून कश्मिरी पंडित आणि हिंदूंचे ‘टार्गेट किलिंग’ कश्मीर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरात अनेक कश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. त्यावर, भाजपाचे राष्ट्रीय नेते गप्प का आहेत, असा सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबादच्या सभेत केला होता. त्यानंतर, आता शिवसेना नेत्यांनी काश्मीरमध्ये जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आहे.  

काश्मिर खोऱ्यातून शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोऱ्यातील या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच, औरंगाबादच्या आपल्या सभेतही त्यांनी काश्मिरी पंडितांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध भाजप नेते गप्प का, असा सवाल केला होता. तसेच, शिवसेना काश्मिरी पंडितांच्या पाठिशी आहे, महाराष्ट्र त्यांच्यासाठी शक्य ती मदत करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले होते. त्याच, पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काश्मीर खोऱ्यात जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. 

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या रजनी बाला यांच्या पती आणि मुलीची भेट घेण्यासाठी प्रियंका चतुर्वेदी गेल्या होत्या. त्यावेळी, रजनी यांच्या मुलीला पाहून गहिवरुन आल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, राज्यपाल महोदयांनी पीडित कुटुंबाची भेट घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, प्रियंका चतुर्वैदी यांनी पीडित कुटुंबीयांची आणि काश्मिरी पंडितांची भेट घेऊन महाराष्ट्र त्यांच्या पाठिशी असल्याचा धीर त्यांना दिल्याचे म्हटले आहे. त्यांच्यासाठी महाराष्ट्राचे दरवाजे कधीही खुले आहेत, असेही ते म्हणाले.   

काश्मिरी पंडितांच्या पाठिशी महाराष्ट्र- मुख्यमंत्री

काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली, पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. याक्षणी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकंच वचन देऊ शकतो की, या कठीण काळात काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील.
 

Web Title: Aditya Thackeray: The doors of Maharashtra are open for you, Shiv Sena has given patience to the afflicted Kashmiri Pandits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.