Rafale Deal: रायफल उत्पादनापासून मोदी सरकारनं अदानींना ठेवलं दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 13:21 IST2018-09-04T13:18:03+5:302018-09-04T13:21:18+5:30
Rafale Deal Controversy: अदानी समूहाला करारामध्ये सहभागी करण्यास सरकारचा नकार

Rafale Deal: रायफल उत्पादनापासून मोदी सरकारनं अदानींना ठेवलं दूर
नवी दिल्ली: राफेल विमान खरेदी प्रकरणात काँग्रेसनं केलेल्या आरोपांचा मोदी सरकारनं धसका घेतल्याचं दिसत आहे. विमान बांधणीचा कोणताही अनुभव नसताना अनिल अंबानींच्या कंपनीला राफेल विमानांच्या निर्मितीचं कंत्राट मिळालं कसं, असा प्रश्न काँग्रेसकडून वारंवार उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या सरकारनं आता अदानी समूहासोबत रायफलची निर्मिती करु पाहणाऱ्या रशियाचा प्रस्ताव नाकारला आहे. अदानी समूहाच्या सहकार्यानं भारतात एके सीरिजमधील अत्याधुनिक रायफल्सची निर्मिती करण्याचा प्रस्ताव रशियाकडून देण्यात आला होता.
संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन लवकरच रशियाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान क्साशनिकोव-103 रायफलचं उत्पादन भारतात करण्याबद्दल चर्चा होऊन दोन देशांमध्ये करार केला जाऊ शकतो. भारतात रायफलची निर्मिती करण्यासाठी अदानी समूहासोबत भागिदारी करण्यास उत्सुक असल्याचं रशियानं म्हटलं होतं. तसा प्रस्तावदेखील रशियानं दिला होता. मात्र मोदी सरकारनं हा प्रस्ताव फेटाळून लावला. दोन देश एकमेकांसोबत करार करत असताना दोन्हीपैकी एकाही देशाचं सरकार आपल्या देशातील खासगी क्षेत्रातील कंपनीचं नाव सुचवू शकत नाही, असा नियम आहे. याचा आधार घेत मोदी सरकारनं रशियाचा प्रस्ताव नाकारला.
भारत आणि रशियामध्ये लवकरच रायफल निर्मितीचा करार होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास रशियाच्या बाजूनं एके-47 सीरिजची निर्मिती करणारी कंपनी कराराचा भाग असेल. भारताच्या बाजूनं ऑर्डिनेन्स फॅक्टरीचा या करारात समावेश केला जाईल. त्यामुळे ऑर्डिनेन्स फॅक्टरीमध्ये या रायफलची निर्मिती केली जाईल. एके-103 रायफल एके-47चं अत्याधुनिक रुप आहे. ही रायफल संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.