Adani Airport Holdings: अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जने चिनी कंपनी ड्रॅगनपाससोबत केलेला करार रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे. एका आठवड्यापूर्वीच या दोन कंपन्यांमध्ये करार झाला होता, अशी माहिती देण्यात आली आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जच्या प्रवक्तांनी प्रसिद्धीपत्रक काढून याबाबतची माहिती दिली.
विमानतळ लाउंजमध्ये प्रवेश प्रदान करणाऱ्या ड्रॅगनपाससोबतचे आमचे सहकार्य तात्काळ प्रभावाने संपुष्टात आणण्यात आले आहे. ड्रॅगनपास ग्राहकांना आता अदानी व्यवस्थापित विमानतळांवर लाउंज अॅक्सेस मिळणार नाही. या बदलाचा विमानतळावरील लाउंज आणि इतर ग्राहकांच्या प्रवासावर कोणताही परिणाम होणार नाही, असे यात म्हटले आहे.
या कराराअंतर्गत ड्रॅगनपास ग्राहकांना विमानतळावरील लाउंजमध्ये प्रवेश देण्यात आला होता. अदानी ग्रुपच्या 'अदानी डिजिटल लॅब्स'ने एका आठवड्यापूर्वीच ड्रॅगनपाससोबत भागीदारीची घोषणा केली होती.
८ मे रोजी याबाबत एक निवेदन देण्यात आले होते. यात म्हटले होते की, अदानी व्यवस्थापित विमानतळांवर लाउंजचे विस्तृत नेटवर्क प्रदान करण्यासाठी ड्रॅगनपाससोबत भागीदारी करार करण्यात आला आहे. मात्र, आता हा करार रद्द करण्यात आला आहे. ड्रॅगनपास ही एक प्रीमियम विमानतळ सेवा प्रदाता आहे. या भागीदारीमुळे प्रवाशांना विमानतळावर आरामदायी लाउंज अनुभव मिळेल असे म्हटले जात होते. पण आता हा करार रद्द करण्यात आला आहे.