‘त्या’ संकेतस्थळांविरुद्धची कारवाई हँग
By Admin | Updated: January 5, 2015 03:29 IST2015-01-05T03:26:44+5:302015-01-05T03:29:34+5:30
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इसिससारख्या अतिरेकी संघटनांकडून या संकेतस्थळांवर भारतविरोधी प्रचार सुरू होता़ या संकेतस्थळांविरुद्ध कायदेशीर कारवाई

‘त्या’ संकेतस्थळांविरुद्धची कारवाई हँग
नवी दिल्ली : सुरक्षेच्या कारणावरून मोदी सरकारने भारतविरोधी प्रचार करणाऱ्या ३२ संकेतस्थळांवर बंदी घातली असतानाच, यापैकी अनेक संकेतस्थळांवर पोर्टलच्या मालकांशी संपर्काबाबतचा कुठलाही तपशील दिलेला नसल्याचे सुरक्षा संस्थांना आढळले आहे़ या संकेतस्थळांचे सर्वरही देशाबाहेर होते़
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इसिससारख्या अतिरेकी संघटनांकडून या संकेतस्थळांवर भारतविरोधी प्रचार सुरू होता़ या संकेतस्थळांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे भारताचे मनसुबे आहेत़ मात्र, अमेरिका आणि युरोपात डोमेन नोंदणी केलेली असल्यामुळे आणि अन्य दुसऱ्या संस्थांकडून कुठल्याही प्रकारे सहकार्य मिळत नसल्यामुळे संबंधित संकेतस्थळांविरुद्ध कारवाई करण्यास सुरक्षा संस्थांना यात अडचणी येत आहेत़ या संकेतस्थळांपैकी केवळ सात संकेतस्थळांनी भारतीय अधिकाऱ्यांद्वारे पाठविलेल्या नोटीसचे उत्तर दिले़ तसेच यापुढे आपल्या संकेतस्थळावरून अतिरेकी कारवायासंबंधित प्रचार-प्रसार होणार नाही, अशी हमी दिली़
सरकारने अलीकडे मुंबईच्या एका न्यायालयीन आदेशानंतर ३२ संकेतस्थळांवर बंदी लादली होती़ टिष्ट्वटर आणि सोशल मीडियातून सरकारच्या या कारवाईविरोधात टीकेचे सूर उठले होते़ मात्र, देशाच्या सुरक्षेशी कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगत, सरकारने ठामपणे आपल्या कारवाईचे समर्थन केले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)