दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडत आहे. आयएमडीने दिल्ली आणि आसपासच्या भागात वादळ येण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काही तासांतच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. वाऱ्याचा वेग ताशी ७० किमी आणि काही ठिकाणी त्याहून अधिक होता. नोएडा, गुरुग्राम, फरीदाबाद, गाझियाबाद आणि ग्रेटर नोएडासह अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
गाझियाबादमध्ये एक दुर्घटना घडली आहे. अंकुर विहार एसीपी ऑफिसच्या खोलीचं छत अचानक कोसळलं. त्यामुळे खोलीत झोपलेले सब-इन्स्पेक्टर वीरेंद्र कुमार मिश्रा (५८) यांचा छताच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पावसामुळे एसीपी कार्यालयाचं छत कोसळलं. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
उपनिरीक्षकांचा फोन लागत नव्हता आणि खोलीचा दरवाजा उघडा आढळल्याने संशय वाढला, तेव्हा शोध सुरू करण्यात आला. वीरेंद्र कुमार मिश्रा हे ढिगाऱ्याखाली आढळले. त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. रविवारी सकाळी मुसळधार पाऊस आणि वादळानंतर दिल्लीतील अनेक भागात पाणी साचलं होतं.
मिंटो रोड, एअरपोर्ट टर्मिनल १ तसेच मोतीबागमध्ये पाणी साचल्याने अडचण निर्माण झाली आहे. यामुळे रविवार असला तरी अनेक भागातील वाहतूक प्रभावित झाली आहे. १०० हून अधिक विमानउड्डाणे प्रभावित झाली आहेत. २५ हून अधिक विमानफेऱ्या दुसरीकडे वळविण्यात आल्या आहेत. अनेक विमानांच्या फेऱ्यांना विलंब होत आहे. खराब हवामानामुळे रात्रीच्या वेळी उड्डाण करणारी विमाने विलंबाने होती असं विमानतळ प्रशासनाने सांगितलं आहे.