१० मिनिटांपर्यंत ट्रेनमध्ये न पोहोचल्यास तिकिट रद्द होणार का? जाणून घ्या यामागील सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 18:10 IST2023-07-22T18:10:36+5:302023-07-22T18:10:58+5:30
Indian Railway : रेल्वेने केलेल्या प्रत्येक बदलाचा सामान्यांवर मोठा परिणाम होत असतो.

१० मिनिटांपर्यंत ट्रेनमध्ये न पोहोचल्यास तिकिट रद्द होणार का? जाणून घ्या यामागील सत्य
Railway New Rules | नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोच्या घरात आहे. भारतीय रेल्वे नवनवीन उपक्रम, नवनवीन बदल करून प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी प्रयत्नशील असते. रेल्वेने केलेल्या प्रत्येक बदलाचा सामान्यांवर मोठा परिणाम होत असतो. दरम्यान, सोशल मीडिया आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, जर एखादा प्रवासी रेल्वेच्या नियोजित वेळेच्या १० मिनिटांपर्यंत आपल्या सीटवर पोहोचला नाही तर त्याचे तिकिट रद्द केले जाऊ शकते.
अनेकदा उशीर झाल्यामुळे प्रवासी त्यांच्या मूळ स्टेशनऐवजी पुढील स्टेशनवर जाऊन ट्रेन पकडतात. पण, या नवीन नियमानंतर ते ट्रेनमध्ये चढू शकणार नाहीत, असे सांगितले जात आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, रेल्वेने नवा नियम बनवला आहे. त्यानुसार, ट्रेन सुरू झाल्यानंतर १० मिनिटांत प्रवासी सीटवर पोहोचला नाही, तर संबंधित प्रवाशाचे तिकीट रद्द केले जाईल.
१० मिनिटे उशीर झाल्यास तिकीट रद्द होणार?
भारतीय रेल्वेमध्ये चेंकिंग स्टाफ हॅन्ड हेल्ड टर्मिनलच्या माध्यमातून तिकीट चेकिंग केले जाते. यात प्रवासी आला आहे किंवा नाही याची माहिती द्यावी लागते. यापूर्वी हे काम कागदांवर चालायचे. यात टीटीई पुढील स्टेशनपर्यंत वाट पाहत होता. अशा परिस्थितीत जर कोणी १० मिनिटांपर्यंत त्याच्या सीटवर आला नाही तर त्याचे तिकीट रद्द केले जाईल. पण, लक्षणीय बाब म्हणजे अद्याप रेल्वेने याबाबत कोणताही आदेश जारी केला नाही. या आदेशाबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, असा कोणताही आदेश रेल्वेकडून जारी करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेल्वेच्या म्हणण्यानुसार सध्याच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.