आयएनएस गंगावर अपघात
By Admin | Updated: May 9, 2014 14:29 IST2014-05-09T14:04:53+5:302014-05-09T14:29:27+5:30
नौदलात अपघातांची मालिका थांबण्याची चिन्हे नसून शुक्रवारी दुपारी मुंबई डॉकयार्ड येथे नौदलाच्या आयएनएस गंगा या युध्दनौकेवर अपघात होऊन तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

आयएनएस गंगावर अपघात
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ९ - नौदलात सुरू असलेली अपघातांची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नसून शुक्रवारी दुपारी मुंबई डॉकयार्ड येथे नौदलाच्या आयएनएस गंगा या युध्दनौकेवर अपघात होऊन तीन जण जखमी झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या युद्धनौकेचे नियमित देखभाल-दुरूस्तीचे काम सुरू असताना नौकेच्या बॉयलर रुमध्ये छोटीशी आग लागल्याचे नौकेवरील जवानांच्या लक्षात आले. या अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
गेल्या दीड वर्षात नौदलात सुमारे डझनभर अपघात झाले असून गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सिंधुरक्षक या पाणबुडीला झालेल्या अपघातात सुमारे १८ जणांचा बळी गेला होता व ही पाणबुडीही बुडाली होती. तर २७ जानेवारी २०१४ रोजी नौदलातून विश्रांती देण्यात आलेल्या आणि तमिळनाडू सरकारच्या पर्यटन विभागाकडे असलेल्या "आयएनएस वागली' या जुन्या पाणबुडीवरील दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या महिन्याभरात म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी मुंबईजवळ समुद्रात आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीला लागलेल्या आगीत धुराने गुदमरून सात नौसैनिक जखमी झाले, तर दोन अधिका-यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच घटनेनंतर नौदलप्रमुख अॅडमिरल डी. के. जोशी यांनी पदाचा राजीनामा दिला.