सुंदर नसतानाही मी तिला आमदार बनवलं - मुलायम सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2015 17:40 IST2015-09-09T17:40:43+5:302015-09-09T17:40:43+5:30
महिलांविषयी वादग्रस्त विधान केल्याने नेहमीच चर्चेत असणारे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.

सुंदर नसतानाही मी तिला आमदार बनवलं - मुलायम सिंह
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - महिलांविषयी वादग्रस्त विधान केल्याने नेहमीच चर्चेत असणारे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. पक्षातील एका महिला आमदाराचा दाखला देताना 'ती सुंदर नव्हती, पण तरीदेखील मी तिला आमदार बनवले' असे विधान मुलायमसिंह यादव यांनी केले आहे.
समाजवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांचा नवी दिल्लीत मेळावा पार पडला. यात मुलायमसिंह यादव यांनी महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. नरेंद्र मोदी व अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज मंडळींनी मी महान नेता असल्याचे म्हटले आहे. पण माझ्या पक्षातील कार्यकर्तेच माझे नाव घेत नाहीत अशी खंत मुलायमसिंह यांनी व्यक्त केली.
महिलांच्या दिसण्यापेक्षा पक्षासाठी काम महत्त्वाचे आहे हे पटवून देण्याच्या प्रयत्नात मुलायमसिंह यादव यांची जीभ घसरली. पक्षाच्या आमदार लीलावती कुशवाह यांचा दाखला देताना मुलायम सिंह म्हणाले, त्या सुंदर नाही पण तरीदेखील मी त्यांना आमदार बनवले, त्यांनी पक्षासाठी लाठी खाल्ली आहे. मुलायमसिंह यांच्या या विधानावर आता टीका सुरु झाली आहे.