Abhinandan Varthaman Squadrons Get Falcon Slayer Amraam Dodgers Patches | शूरा आम्ही वंदिले! अभिनंदन यांच्या युनिटच्या नावात बदल; शौर्याला अनोखी मानवंदना
शूरा आम्ही वंदिले! अभिनंदन यांच्या युनिटच्या नावात बदल; शौर्याला अनोखी मानवंदना

नवी दिल्ली: पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्यामुळे त्यांच्या युनिटला नवी ओळख मिळाली आहे. 51 व्या स्कॉड्रनमधल्या बायसन जेट्सच्या पायलट्सनी त्यांच्या जी-सूटवर (गणवेश) फाल्कन स्लेअर असा बॅच लावला आहे. आता या युनिटला याच नावानं ओळखलं जाईल. 

अभिनंदन यांच्या युनिटमधील पायलट्सनी त्यांच्या गणवेशावर नवा बॅच लावला आहे. यावर फाल्कन स्लेअर लिहिण्यात आलं आहे. भारतीय लढाऊ विमान पाकिस्तानच्या एफ-16ला पाडत असल्याचं चित्र या बॅचवर आहे. यासोबतच अभिनंदन यांचं युनिट स्वत:ला अभिमानानं 'आमरार डॉजर्स' म्हणवून घेतं. अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या एफ-16 मधून डागण्यात आलेल्या 4 ते 5 आमरार क्षेपणास्त्रांपासून स्वत:चा बचाव केला होता. त्यामुळेच त्यांचं युनिट 'आमरार डॉजर्स' म्हणवून घेतं. 

भारतानं 26 फेब्रुवारीला बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केल्यावर पाकिस्तानच्या 27 फेब्रुवारीला एफ-16, जेएफ-17 आणि मिराज लढाऊ विमानांनी भारताच्या सैन्य तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या सुखोई, बायसन, मिग आणि मिराज विमानांनी हा हल्ला हाणून पाडला. भारताच्या आणि पाकिस्तानच्या विमानांमध्ये जोरदार चकमक झाली. यावेळी अभिनंदन यांनी त्यांच्या मिग-21 मधून पाकिस्तानचं अत्याधुनिक एफ-16 विमान पाडलं. मात्र यानंतर त्यांचं विमान क्रॅश झालं. अभिनंदन यांनी योग्य वेळी उडी मारल्यानं त्यांचे प्राण वाचले. त्यानंतर ते पाकिस्तानच्या ताब्यात सापडले. 60 तासांनंतर त्यांची सुटका झाली. 
 


Web Title: Abhinandan Varthaman Squadrons Get Falcon Slayer Amraam Dodgers Patches
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.