दिल्ली विधानसभेत AAPच्या आमदारांचा प्रचंड गदारोळ, सर्वच्या सर्व 22 आमदार निलंबित; आतिशी देखील सभागृहाबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 13:03 IST2025-02-25T13:03:12+5:302025-02-25T13:03:53+5:30
हा गदारोळ एवढा वाढला की, शेवटी विधानसभा अध्यक्षा विजेंदर गुप्ता यांनी विरोधीपक्ष नेत्या आतिशी यांच्यासह AAP च्या सर्वच्या सर्व आमदारांना संपूर्ण दिवसासाठी निलंबित करत, सभागृहाबाहेर केले.

दिल्ली विधानसभेत AAPच्या आमदारांचा प्रचंड गदारोळ, सर्वच्या सर्व 22 आमदार निलंबित; आतिशी देखील सभागृहाबाहेर
दिल्ली विधानसभेत मंगळवारी प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. नव्हे, सभागृहाचे कामकाजच गदारोळातच सुरू झाले. खरे तर, उपराज्यपालांच्या अभिभाषणादरम्यानच आम आदमी पक्षाच्या आमदारांनी गदारोळ सुरू केला. हा गदारोळ एवढा वाढला की, शेवटी विधानसभा अध्यक्षा विजेंदर गुप्ता यांनी विरोधीपक्ष नेत्या आतिशी यांच्यासह AAP च्या सर्वच्या सर्व आमदारांना संपूर्ण दिवसासाठी निलंबित करत, सभागृहाबाहेर केले.
आपल्या भाषणात काय म्हणाले उपराज्यपाल ? -
आपल्या भाषणात, उपराज्यपाल म्हणाले, "सरकार यमुना, प्रदूषण, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि अनधिकृत वसाहतींचे नियमितीकरण यासह पाच मुख्य गोष्टींवर काम करेल. उपराज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान, भाजप आमदार 'मोदी-मोदी'च्या घोषणा देत असल्याचे दिसून आले.
विधानसभेबाहेर AAP च्या आमदारांचे निर्दश -
दरम्यान, सभागृहाबाहेर करण्यात आलेल्या आपच्या आमदारांनी हातात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन विधानसभेबाहेर निदर्शने केली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना आतिशी म्हणाल्या, भाजपने मुख्यमंत्री कार्यालय आणि मंत्र्यांच्या कार्यालयातून बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढून त्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला आहे. माझा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रश्न आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठे झाले आहेत का? याच्या विरोधातच आम आदमी पक्षाने निदर्शन केले आहे." एवढेच नाही तर, "जोवर बाबासाहेबांचा फोटो त्यांच्या जागेवर लावला जात नाही, तोवर आम्ही सभागृहपासून ते रस्त्यापर्यंत निदर्शने करत राहू."
आजच सादर होणार मद्य धोरणासंदर्भातील कॅगचा अहवाल -
गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज अर्ध्यातासासाठी स्थगित करण्यात आले. आजच केजरीवाल काळातील मद्य धोरणासंदर्भातील कॅगचा अहवाल विधानसभेत मांडला जाणार आहे. यानंतर आणखी गदारोळ होण्याची शक्यता आहे.