"आम्ही छोटी लढाई हारतो, पण मोठी युद्धं जिंकतो"; पराभवानंतर AAP नेत्याची विचित्र प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:41 IST2025-02-08T17:39:42+5:302025-02-08T17:41:23+5:30
Saurabh Bhardwaj, AAP vs BJP, Delhi Assembly Elections 2025: सलग दोन टर्म जोरदार बहुमत मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाला यंदा दिल्लीकरांनी नाकारलं

"आम्ही छोटी लढाई हारतो, पण मोठी युद्धं जिंकतो"; पराभवानंतर AAP नेत्याची विचित्र प्रतिक्रिया
Saurabh Bhardwaj, AAP vs BJP, Delhi Assembly Elections 2025 : सलग दोन वेळा एकतर्फी विजय मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाची यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुरती वाताहत झाली. एकेकाळी ६० हून जास्त जागा जिंकणाऱ्या आपला या निवडणुकीत २५ जागांचा टप्पाही ओलांडता आला नाही. भाजपाने केलेली मोर्चेबांधणी, आपच्या नेतेमंडळींवर झालेले घोटाळ्याचे आरोप आणि काही अंशी अतिआत्मविश्वास या तीन प्रमुख कारणांमुळे आपला या निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपाने ७० पैकी ४८ जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा तर गाठलाच. पण त्यासोबतच आम आदमी पक्षाच्याही बऱ्याच जागा कमी केल्या. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पराभव मान्य करून विरोधीपक्षाची भूमिका चोख पार पाडणार असल्याचे स्पष्ट केले. पण आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी मात्र या पराभवावर एक अजब प्रतिक्रिया दिली.
ग्रेटर कैलाश विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या शिखा रॉय यांनी विजय मिळवला. त्यांनी आपच्या सौरभ भारद्वाज यांचा पराभव केला. या पराभवावर प्रतिक्रिया देताना सौरभ भारद्वाज म्हणाले, "आम आदमी पक्षाचे सर्व समर्थक, कार्यकर्ता आणि दानदाता यांचे मी आभार मानतो. मी त्यांना सांगू इच्छितो की कुणीही घाबरून जाऊ नका, निराश होऊ नका. आपण अशा छोट्या छोट्या लढाई हरतो, पण मोठमोठी युद्धं जिंकतो. त्यामुळे घाबरण्याची काहीही गरज नाही आपण पुन्हा एकदा लढू या आणि ठामपणे उभे राहूया."
"मला वाटते की आमदार असताना आपण सगळ्यांनी लोकांची शक्य ती सर्व सेवा केली. आम्ही नक्कीच या पराभवाचे चिंतन करू. अशा प्रकारचा निकाल का आला यावरही नक्कीच चर्चा करू. कारण माझ्या मतदारसंघामध्ये सर्व लोकांनी असा अंदाज बांधला होता की आम आदमी पक्षाचा आलेख खूपच चांगला आहे. अप्रूवल रेटिंग देखील चांगले होते. एवढेच नाही तर भाजपाचे कट्टर समर्थक देखील म्हणत होते की इथून आपच निवडणूक जिंकेल. पण आपण आता पराभव मान्य करायला हवा आणि पुढच्या कामाला लागायला हवे," अशी संयमित प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
दरम्यान, ग्रेटर कैलाश मतदारसंघातून भाजपाच्या शिखा रॉय, आपचे सौरभ भारद्वाज आणि काँग्रेसचे गरवीत सिंघवी अशी तिरंगी लढत झाली. भाजपा आणि आप यांच्यात काँटे की टक्कर झाली. अखेर ४९,५९४ मतांसह शिखा रॉय विजयी झाल्या. तर ४६,४०६ मते मिळवणारे सौरभ भारद्वाज ३,१८८ मतांनी पराभूत झाले. काँग्रेसचे गरवीत सिंघवी यांना केवळ ६,७११ मते मिळाली.