‘आप’ने राष्ट्रीय, प्रादेशिक पातळीवर आशावाद निर्माण केला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 03:47 AM2020-02-16T03:47:38+5:302020-02-16T09:00:33+5:30

‘आप’ची वैचारिक भूमिका त्यांच्या पाच वर्षांतील कामगिरीमधून घडविली गेली.

The AAP has created optimism at the national, regional level | ‘आप’ने राष्ट्रीय, प्रादेशिक पातळीवर आशावाद निर्माण केला आहे

‘आप’ने राष्ट्रीय, प्रादेशिक पातळीवर आशावाद निर्माण केला आहे

Next

दिल्लीची ही निवडणूक वैचारिक संघर्षाचा एक महत्त्वाचा लढा होता. दिल्ली संपूर्ण भारताचे एक छोटे स्वरूप आहे. तेथे वैचारिक संघर्ष झाला. कल्पित राष्ट्रवाद आणि सामाजिक न्याय हा दोन प्रकारचा वैचारिक सत्तासंघर्ष आहे. भाजपचा प्रचार राष्ट्रवाद, भारत-पाक, हिंदू-मुस्लिम या मुद्द्यांवर केंद्रित झाला होता. हा एका अर्थाने कल्पित राष्ट्रवाद आहे. या राष्ट्रवादासंदर्भात ‘आप’ने धार्मिक अंतराय उभा राहू दिला नाही. त्यांनी धार्मिक अंतराय रोखला. विशेष म्हणजे, मोदी विरुद्ध केजरीवाल असा अंतराय उभा राहू दिला नाही. याचे दोन महत्त्वाचे अर्थ आहेत. एक, अंतरायापेक्षा समन्वय या गोष्टीला ‘आप’ने स्वीकारले. त्यांनी ‘सामाजिक सलोखा’ हा कळीचा समझोता निवडणूक क्षेत्रात घडविला. दोन, ‘आप’ने हिंदू अस्मिता सुस्पष्टपणे व्यक्त केली. त्यांनी बहुल पद्धतीची हिंदू अस्मिता व्यक्त केली. त्यामुळे मोदी-शहांची हिंदुत्व अस्मिता आणि हिंदू अस्मिता यांपैकी हिंदू अस्मितेकडे झुकता कल राहिला.

‘आप’ची वैचारिक भूमिका त्यांच्या पाच वर्षांतील कामगिरीमधून घडविली गेली. ‘आप’ने शाळा, रस्ते, वीज अशी विकासोन्मुख भूमिका घेतली होती. याबरोबर निवडणूक काळात त्यांनी नेतृत्वापेक्षा विकास हा विचार मध्यवर्ती ठेवला. ‘आप’ने धार्मिक अंतराय हा मुद्दा बाजूला ठेवला. यामुळे ही सर्व राजकीय प्रक्रिया सामाजिक न्यायाच्या चौकटीत ‘आप’ने घडवून आणली, असा युक्तिवाद केला जातो. यामध्ये तथ्य आहे. त्यामुळे भाजपला त्यांचे डावपेच बदलण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी मोदींचे नेतृत्व आणि विधानसभेसाठी केजरीवालांचे नेतृत्व हा नेतृत्वकेंद्री विचार होता. या दोन्ही नेतृत्वांमध्ये फरक आहे. केजरीवाल विकासाधारित आणि मोदी हिंदुत्वाधारित राजकारण घडवीत आहेत. अशा दोन भिन्न टोकांच्या राजकारणाचे समर्थन दिल्लीमध्ये केले गेले. त्यामुळे एकवेळ सारासार विवेक आणि दुसऱ्या वेळी हिंदुत्व असे मतदारांचे दुहेरी स्वरूप असते. अशी मतदारांची दुहेरी जीवनपद्धती लोकशाहीविरोधी ठरते. त्यामुळे अशा प्रकारच्या मतदारांच्या वर्तनाला नैतिक व लोकशाही समर्थक असे कितपत म्हणता येईल, हा प्रश्न उपस्थित होतो. मतदार वर्गाच्या संदर्भात नैतिकचा मुद्दा शिल्लक राहतो. यामुळे ही निवडणूक भाजपचा पराभव म्हणून जास्त महत्त्वाची आहे. त्यापेक्षा मतदारांचे नैतिक, राजकीय चारित्र्य, आक्रमक राष्ट्रवाद, विकासवाद अशा चौकटीमध्ये मुक्त संचार करते असे दिसते; म्हणून ते जास्त चिंताजनक आहे. मतदारराजा अशी त्यांची प्रतिमा असली, तरी मतदार राजाची मुक्ती ढोंगीपणा आणि बेबनाव या गोष्टींपासून होत नाही. या अर्थाने मतदार राजा एका नवीन साटेलोटे चळवळीत अडकला आहे. साटेलोटे चळवळीचा तो कार्यकर्ता व नेता झाला आहे. अशा चळवळीपासून त्याने फरकत घेतली, तरच तो पर्यायी राजकारणाचा विचार करतो, असे म्हणता येईल. या क्षेत्रात राजकीय पक्ष फार काम करीत नाहीत. निवडणुकीतील यश-अपयशाच्या आधारे मतदार राजाचे गौरवीकरण आणि विकृतीकरण करणाऱ्या प्रवृत्ती आहेत. तरीही ‘आप’ने विकासाचे राजकारण करणारा कार्यकर्ता घडविला. त्यांनी विकासाचे एक प्रारूप विकसित केले. त्याबद्दल सत्ताधारी वर्ग सकारात्मक भाष्य करतो. त्यामुळे ‘आप’च्या निवडणुकीय राजकारणाला मर्यादा राहूनदेखील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर एक आशावाद निर्माण झाला.

भाजपला आश्वासनांमुळे पत्करावी लागली हार
आता नजीकच्या काळात बिहारमध्ये निवडणूक आहे. ती जिंकण्यासाठी भाजपाने धर्म आधारित भावनिक राष्ट्रवाद, देशभक्ती, हिंदू- मुस्लिम अशा धृवीकरणाचे राजकारण केले. दिल्लीत याचा उपयोग झालाच नाही. दिल्लीत विकासकामांवर आधारित मते देण्यात आली. अशा परिस्थितीत केजरीवाल यांनी आपली कामे दाखवून दिल्लीत निवडणूक जिंकली. जनतेने भाजपला पूर्णपणे नाकारले. आता नितीशकुमार, पासवान आणि लालूप्रसाद जनतेच्या मागण्यांना कसे सामोरे जातील, त्यावर भाजप आपली चाल बदलेल. भाजप नेते निवडणुकीच्या काळात बेधडक विधाने करतात. जावडेकरांनी विधान केले की, केजरीवाल दहशतवादी आहे. यावरून त्यांना यू टर्न घ्यावा लागला. लोकांची दिशाभूल केली जाते. विधाने मागे घेणे असे प्रकार केले जातात. ते सर्व जनतेसमोर उघडे पडले. भाजपचा दुट्टपी चेहरा जनतेसमोर पोहोचला. विकासाच्या विरुद्ध भावनिक मुद्दे अशी लढाई कधी झाली नव्हती. त्यामुळे जनतेला हा निर्णय घेता आला. पुढच्या राजकारणात दिल्लीचा प्रभाव सर्वत्र पडणार आहे. महाराष्ट्रातही शाळांचा दर्जा सुधारणे, दोनशे युनिट वीज मोफत, अशा नागरिकांच्या मागण्या जोर धरत आहेत. त्या पुढे आल्या तर भावनिक मुद्दे बाजूला पडतील. दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेस हा सतत पर्याय म्हणूनच उभा राहिला. त्यांना विश्वासार्हता टिकवता आली नाही. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने नुसती आश्वासने दिली.

- मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टीचे पुणे शहराध्यक्ष


‘आप’चे यश विकासकामांमुळेच

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात ‘आप’ने वीज, पाणी, निवारा व शिक्षण या मुद्यांवरच भर दिला. महत्त्वाचे म्हणजे शिक्षणक्षेत्र हा देखील प्रचाराचा प्रमुख मुद्दा होऊ शकतो, हे केजरीवाल यांनी दाखवून दिले. भाजपला हा निकाल नक्कीच विचार करायला लावणारा आहे. ज्याप्रकारे भाजपच्या हातातून एकेक राज्य निसटून चालले आहे, त्यानुसार २०२२ ची राष्ट्रपती निवडणूक भाजपासाठी एकतर्फी होईल असे वाटत नाही. प्रमुख प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी आपण शुन्यावर बाद होऊन इतरांच्या विजयामध्ये आनंदोत्स साजरा करायचा हे काँग्रेसचे धोरण त्यांना हानिकारक ठरू शकते.

- अजय अंधारे,
तीर्थपुरी, ता. घनसावंगी, जि. जालना

Web Title: The AAP has created optimism at the national, regional level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.