आप’चा पाठिंबा कोणत्याच आघाडीला नाही - केजरीवाल
By Admin | Updated: May 12, 2014 04:47 IST2014-05-12T04:47:24+5:302014-05-12T04:47:24+5:30
वेळ आल्यास तिसर्या आघाडीलाही पाठिंबा देण्याची तयारी आम आदमी पार्टीने (आप) दर्शविल्याच्या बातम्या खोडसाळ असल्याचे स्पष्टीकरण अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे.

आप’चा पाठिंबा कोणत्याच आघाडीला नाही - केजरीवाल
वाराणशी : भारतीय जनता पार्टीला (भाजपा) सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी वेळ आल्यास तिसर्या आघाडीलाही पाठिंबा देण्याची तयारी आम आदमी पार्टीने (आप) दर्शविल्याच्या बातम्या खोडसाळ असल्याचे स्पष्टीकरण अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशातील लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचे मतदान उद्या सोमवारी संपत असतानाच, आपचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना तिसर्या आघाडीला सरकार स्थापनेसाठी आमच्या पाठिंब्याची गरज भासलीच तर मुद्यांच्या आधारावर आम्ही पाठिंबा देऊ शकतो़ तथापि, निवडणूक निकालांचे विश्लेषण केल्यानंतरच पक्ष आपली भूमिका ठरवेल, असे सांगितले होते. आमचे आंदोलन आम आदमीसाठी आहे़ त्यामुळे निश्चितपणे मुद्यांवर आधारित पाठिंबा देण्याचा विचार आम्ही करू शकतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली़ राय यांच्या या वक्तव्यानंतर आप तिसर्या आघाडीला समर्थन देणार हा अन्वयार्थ वेगाने बातम्यांमधून पसरला. त्यावर कोणत्याही आघाडीला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद््भवत नसल्याचे स्पष्टीकरण केजरीवाल यांनी दिले. आपने ४२२ जागांवर आपले उमेदवार उतरविले आहेत़ आपला पक्ष कमीतकमी १०० जागा जिंकेल, असा विश्वास केजरीवाल यांनी बोलून दाखवला आहे़ जागांबाबत राय यांना विचारले असता ते म्हणाले, किती जागा जिंकू, हा आमच्यासाठी गौण मुद्दा आहे़ निकाल कसाही येवो, आमचा संघर्ष सुरू राहणाऱ प्रामाणिक राजकारण्यांचा आवाज संसदेत पोहोचावा, हा आमचा हेतू आहे़
केजरीवाल यांना निवडणूक आयोगाची नोटीस
निवडणूक आयोगाने रविवारी आम आदमी पक्ष नेते अरविंद केजरीवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.काँग्रेस आणि भाजपाला दिलेले प्रत्येक मत ‘प्रभू आणि राष्ट्र’च्या विरुद्ध अविश्वास असेल, असे कथित विधान केजरीवाल यांनी अमेठीत केले होते. त्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. केजरीवाल यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. १३ मे पर्यंत त्यांना बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे. केजरीवालांकडून मुदतीत उत्तर न मिळाल्यास आयोग आपल्या पद्धतीने निर्णय घेईल.