आधार क्रमांक मतदार यादीला जोडणार
By Admin | Updated: February 14, 2015 23:43 IST2015-02-14T23:43:14+5:302015-02-14T23:43:14+5:30
बोगस मतदार वगळण्यासाठी निवडणूक आयोग १ मार्चपासून आधार क्रमांक मतदार याद्यांशी जोडण्याची मोहीम राबविणार आहे.

आधार क्रमांक मतदार यादीला जोडणार
हैदराबाद : बोगस मतदार वगळण्यासाठी निवडणूक आयोग १ मार्चपासून आधार क्रमांक मतदार याद्यांशी जोडण्याची मोहीम राबविणार आहे. सर्व ६७६ जिल्ह्यांत मतदार यादी शुद्धीकरण आणि एक खात्रीशीर आणि विश्वसनीय माहिती साठा (डाटा बेस) तयार करण्याची मोहीम १५ आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा प्रस्ताव आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त एच.एस. ब्रह्मा यांनी सांगितले.
आधार क्रमांक मतदार याद्यांशी संलग्न करणे, या विषयावरील एका कार्यशाळेनंतर त्यांनी ही माहिती दिली. शंभर टक्के खऱ्याखुऱ्या राष्ट्रीय मतदार यादीसाठी माहिती साठा तयार करण्याचा यामागचा इरादा आहे. जनतेने आधार क्रमांक राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर टाकावा, असे आवाहनही त्यांनी केले. हे पोर्टल २५ जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहे. आॅनलाईन मतदानाची प्रक्रिया सुरू करण्याचा बेत आहे का? असे विचारले असता ब्रह्मा यांनी स्पष्ट केले की, यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल. विशेष म्हणजे या मुद्यांवर (आॅनलाईन वोटिंग) मतभेद आहेत. भारतीय इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर मतदान नोंदविले जावे, असे राजकीय पक्षांचे मत आहे. २००६ पूर्वीचे ८ लाख मतदान यंत्रे (ईव्हीएम) टप्प्याटप्प्याने बदलली जातील, अशी माहितीही त्यांनी दिली. (वृत्तसंस्था)