अरुणाचलमधून बेपत्ता झालेला तरुण चिनी लष्कराला सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 07:17 IST2022-01-24T07:17:13+5:302022-01-24T07:17:44+5:30
भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू

अरुणाचलमधून बेपत्ता झालेला तरुण चिनी लष्कराला सापडला
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशमधून बेपत्ता झालेला १७ वर्षीय मिराम ताराेम या तरुणाचे अपहरण झाल्याचा आराेप करण्यात आला हाेता. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) मात्र ताे सापडल्याची माहिती भारतीय लष्कराला दिली आहे.
तेजपूर येथील जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन पांडे यांनी सांगितले की, अरुणाचल प्रदेशमधून हरविलेला मुलगा सापडल्याची माहिती चीनच्या लष्कराने दिली आहे. चीनच्या सीमेजवळ ताे सापडला आहे. त्याला भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिराम ताराेम हा १८ जानेवारीला बेपत्ता झाला हाेता. मात्र, अरुणाचल प्रदेशचे खासदार तापीर गाओ यांनी त्याचे अपहरण झाल्याचा दावा केला हाेता. त्याच्या मित्रानेही ताराेमचे अपहरण झाल्याचे सांगितले हाेते.