आधुनिक सावित्री! पतीला वाचवण्यासाठी पत्नीने लावली जीवाची बाजी; ४० फूट विहिरीत मारली उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:17 IST2025-02-06T15:16:44+5:302025-02-06T15:17:47+5:30
पती-पत्नी दोघेही विहिरीत होते, तोपर्यंत स्थानिकांनी फायर ब्रिगेडला कॉल करून मदतीला बोलावले

आधुनिक सावित्री! पतीला वाचवण्यासाठी पत्नीने लावली जीवाची बाजी; ४० फूट विहिरीत मारली उडी
एर्नाकुलम - केरळच्या एर्नाकुलम इथं एका पत्नीने पतीला वाचवण्यासाठी ४० फूट खोल विहिरीत उतरली. ६४ वर्षीय रामेसन बेशुद्ध अवस्थेत विहिरीत पडले होते त्यावेळी कुठलाही विचार न करता पत्नीने पतीला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली. त्यानंतर बचावासाठी आलेल्या प्रशासकीय यंत्रणांनी दोघांनाही सुखरूप विहिरीच्या बाहेर काढले.
पिरावोम नगरपालिकेतील निवृत्त अधिकारी रामेसन हे त्यांच्या अंगणातील एका विहिरीजवळ उभे राहून मिरच्या तोडत होते. त्यावेळी ज्या झाडाच्या फांदीवर ते पाय ठेवून उभे होते, ती तुटली त्यामुळे रामेसन यांचा तोल बिघडला आणि ते विहिरीत पडले. ही विहिर ४० फूट खोल होती. त्यात ५ फुटापर्यंत पाणी होते. रामेसन यांच्या पत्नीने ही घटना पाहिली तेव्हा ती धावत विहिरीजवळ आल्या. त्यांनी बाकी काही विचार न करता रस्सीच्या सहाय्याने विहिरीत उतरल्या. त्यांनी रामेसन यांना फायर ब्रिगेडची गाडी येत नाही तोपर्यंत पकडून धरले होते.
विहिरीत उतरण्यापूर्वी पत्नीने पतीला बाहेर काढण्यासाठी प्लास्टिकची रस्सी खाली फेकली परंतु पतीला दुखापत झाल्याने त्यांना वरती येता आले नाही. तेव्हा पत्नीने आसपासच्या लोकांना सांगून मदतीसाठी फायर ब्रिगेडला बोलावले त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या पतीला वाचवण्यासाठी विहिरीत उतरल्या. रस्सीच्या मदतीने पत्नी पद्मन विहिरीत उतरत होत्या, मात्र त्यांच्या हाताची पकड सैल झाल्याने त्यांनी विहिरीत उडी मारण्याचा निर्णय घेतला. पत्नी पद्मन यांनी पतीला पाण्याबाहेर काढून एका दगडाला टेकून उभ्या राहिल्या होत्या.
पती-पत्नी दोघेही विहिरीत होते, तोपर्यंत स्थानिकांनी फायर ब्रिगेडला कॉल करून बोलावले. फायर ब्रिगेडचं पथक घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांनी रस्सी आणि जाळीच्या मदतीने दोघांना वाचवले आणि त्यानंतर तातडीने रुग्णालयात नेले. या दोघांना किरकोळ जखमा झाल्या असून सोशल मीडियावर या घटनेची बरीच चर्चा आहे. पतीचा जीव वाचवण्यासाठी पत्नीने केलेल्या धाडसाचं नेटिझन्स कौतुक करत आहेत.