जत्रेतील मोठ्या आकाश पाळण्याबाबत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच मनात कुतूहल असतं. त्यामुळे या आकाश पाळण्यात बसण्याचा थरारक अनुभव घेण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मात्र या आकाश पाळण्यात बसणं कधीकधी धोकायदकही ठरू शकतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. य व्हिडीओमध्ये एक महिला या आकाश पाळण्यातील एका पाळण्याला लटकलेली दिसत आहे. ही महिला बराच वेळ पाळण्याला लटकून होती. अखेर खूप खटपट केल्यानंतर तिला खाली उतरवण्यात यश आले. यादरम्यान, एखादी चूक या महिलेच्या जिवावर बेतली असती.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सदर व्हिडीओ छत्तीसगडमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. छत्तीसगडमधील एका जत्रेमध्ये ही दुर्घटना घडली. व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक महिला आकाश पाळण्यातील एका पाळण्याला ही महिला लटकलेली दिसत आहे. तसेच ती परत पाळण्यामध्ये येण्यासाठी धडपडताना दिसत आहे. दरम्यान, आकाश पाळणा हळुहळू खाली येतो तेव्हा महिला कशीबशी प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचते. मात्र ती प्लॅटफॉर्मवर उतरण्यापूर्वीच हा पाळणा वर जाऊ लागतो. अखेरीस एका व्यक्ती हिंमत दाखवून तिला आधार देते. त्यानंतर केबिनमध्ये बसलेल्या लोकांनी तिच्या पायांना धरून तिला पाळण्यामध्ये खेचले.
अखेरीच खूप प्रयत्नांनंतर ही महिला पाळण्यामध्ये सुखरूप येण्यात यशस्वी ठरली. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर आता या महिलेचे प्राण वाचवणाऱ्या व्यक्तीचं लोकांकडून कौतुक केलं जात आहे. तसेच आकाश पाळण्यामध्ये बसणं हे जेवढं थरारक आहे, तेवंढंच जीव घेणं असल्याची प्रतिक्रियाही काही जणांकडून व्यक्त केली जात आहे.