वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 19:55 IST2025-10-28T19:52:29+5:302025-10-28T19:55:07+5:30
या प्रकारामुळे झालेला त्रास आणि वेळेत सेवा न दिल्याने न्याय मागण्यासाठी पूनमबेन यांनी ग्राहक कोर्टात धाव घेतली

वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
अहमदाबाद - शहरात एका महिलेला वेळेत ब्लाऊज शिवून न देणे डिझाईनर शॉप मालकाला महागात पडले आहे. ब्लाऊज वेळेवर न मिळाला नाही त्यामुळे लग्नाचा आनंद खराब झाला. त्यानंतर हे प्रकरण ग्राहक कोर्टाकडे गेले. तिथे कोर्टाने ही केवळ सेवेतील चूक नाही तर या प्रकारामुळे ग्राहकाला मानसिक त्रास सहन करावा लागला असं सांगत संबंधित टेलर दुकानावर दंड ठोठावला आहे.
काय आहे प्रकार?
अहमदाबादच्या नवरंगपुरा येथे सोनी डिझाईनर शॉपशी निगडित हे प्रकरण आहे. नवरंगपुरा येथील पूनमबेन पारिया यांनी त्यांच्या लग्नासाठी टेलर दुकानात एक डिझाईनर ब्लाऊज शिवायला दिला होता. या ब्लाऊजच्या शिलाईसाठी पूनमबेन यांनी संपूर्ण खर्च ४ हजार ३९५ रूपये टेलरला आधीच दिले होते. मात्र लग्न झाले तरीही डिझाईनर शॉप मालक हरेश यांनी निर्धारित वेळेत ब्लाऊज शिवून दिला नाही. ज्यामुळे पूनमबेन यांच्या लग्नातील मूड खराब झाला. वेळेवर ब्लाऊज शिवून न दिल्याने महिलेला मानसिक त्रासातून जावे लागले.
ग्राहक कोर्टात घेतली धाव
या प्रकारामुळे झालेला त्रास आणि वेळेत सेवा न दिल्याने न्याय मागण्यासाठी पूनमबेन यांनी ग्राहक कोर्टात धाव घेतली. त्यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि अहमदाबादच्या अतिरिक्त न्यायालयात नुकसान भरपाईसाठी तक्रार दाखल केली. त्या तक्रारीत पुरावा म्हणून पावती, लग्नाचे कार्ड आणि अन्य आवश्यक साक्ष सादर केले. या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी केल्यानंतर ग्राहक कोर्टाने सोनी डिझाईनर शॉपचे मालक हरेश यांच्याविरोधात आदेश दिला. न्यायालयाने तक्रारदाराला त्यांची रक्कम परत देण्यास सांगितले.
ब्लाऊज शिवण्याची मूळ रक्कम - ४३९५ रूपये ७ टक्के वार्षिक व्याजासह परत करावी
मानसिक छळासाठी भरपाई - ५ हजार रूपये
कायदेशीर खर्च - २ हजार रूपये
दरम्यान, ही संपूर्ण नुकसान भरपाई आदेश काढल्यापासून ४५ दिवसांत द्यावी आणि त्याबाबत न्यायालयाला रितसर कळवावे असा आदेशही कोर्टाने दिला आहे. आगाऊ पैसे घेतल्यानंतर वेळेवर सेवा प्रदान करणे ही त्यांची जबाबदारी आहे आणि यामध्ये कोणत्याही निष्काळजीपणामुळे मानसिक छळासह मोठी भरपाई होऊ शकते असा कठोर संदेश कोर्टाच्या निर्णयाने सेवा पुरवठा करणाऱ्यांना मिळाला आहे.